कागर : राजकीय बीजातून खुललेला सिनेमा

>> वैष्णवी कानविंदे-पिंगे

राष्ट्रीय पुरस्कार विजेता दिग्दर्शक मकरंद माने. त्याने प्रेक्षकांच्या मनात ठसवलेला रिंगण. राष्ट्रीय पुरस्कार विजेती रिंकू राजगुरू आणि तिने ठसवलेली ‘सैराट’मधली आर्ची हे समीकरण एकत्र झाल्यामुळे अर्थातच प्रेक्षकांच्या अपेक्षा उंचावल्या होत्या. त्या अपेक्षांनुसार ‘कागर’ या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या सिनेमाने प्रेक्षकांना निश्चितच निराश केलेलं नाही. प्रेम, राजकारण, रणधुमाळी या सगळय़ाचा वेगवान साचा आपल्याला या सिनेमातून पाहायला मिळतो. अर्थात सिनेमा पाहत असताना  (कदाचित ‘सैराट’चा प्रभाव अजूनही पक्का असल्याने) त्याच्या विषय आणि मांडणीमध्ये  ‘सैराट’ची आठवण होते. त्याचा प्रभाव आहे की काय असं वाटत राहतं हे खरं, पण काहीही असलं तरी ‘कागर’ हा एक स्वतंत्र विषय आहे, स्वतंत्र सिनेमा आहे आणि प्रेक्षकांची प्रेक्षकगृहात करमणूक करायला सक्षम असलेला हा सिनेमा नक्कीच प्रेक्षकांवर प्रभाव पाडण्यात यशस्वी झालाय.

‘कागर’ सिनेमा म्हणजे राजकीय गणितं, त्यातून होणार्‍या (कु)खेळ्या आणि युवा नेतृत्व यांची कथा आहे. दोघांच्या राजकारणात प्यादी कशी सरकवावीत हे शिकवणारे चाणाक्ष गुरुजी ग्रामीण राजकारणाचा पट रचत असतात. त्यांना आपल्या स्वतःच्या मुलीने राजकारणात यावं असं मनापासून वाटत असतं. तिला मात्र राजकारणात रस नसतो. गुरुजींचा उजवा हात असणार्‍या तरुणावर तिचं प्रेम असतं, पण राजकारणाच्या खेळात त्याचा बळी जातो. आपल्या प्रियकराला आपल्याच वडिलांनी बळी दिल्याचं या मुलीच्या लक्षात येतं आणि मग ती बाह्या सरसावते, या राजकारणाच्या पटावर संघर्ष करण्यास उभी ठाकते. मग पुढे नेमकं काय होतं, हा संघर्ष नेमका कसा होतो याची कथा म्हणजे ‘कागर’ हा सिनेमा.

रिंकू राजगुरूने या सिनेमातही उत्तम अभिनय केलाय. तिने साकारलेली राणी ही व्यक्तिरेखा उत्तम उभी ठाकली आहे. जरी आर्ची आपल्या मनात कायमस्वरूपी बसली असली तरी ही राणीदेखील तितक्याच खमकेपणाने उभी राहते. शशांक शेंडे, सुहास पळशीकर हे सगळे नाणावलेले कलाकार आहेतच आणि नेहमीप्रमाणे त्यांनी छानच कामं केली आहेत, पण त्यांच्या वाटय़ाला येणार्‍या या भूमिका प्रेक्षकांच्या ओळखीच्याच असल्याने त्यांच्या व्यक्तिरेखा सहज वाटतात, पण वेगळेपणा मात्र जाणवत नाही. भारती पाटील, विठ्ठल काळे या तशा छोट्या भूमिकांमधल्या व्यक्तिरेखा मात्र लक्षात रहातात. त्यांच्या अभिनयातली ठसण, संवाद फेक आणि एकूणच व्यक्तिरेखा छान उभी राहिली आहे. शुभंकर तावडेनेदेखील छान अभिव्यक्ती रंगवली आहे.

कदाचित पटकथा आणखी थोडी घट्ट असती तर हा सिनेमा जास्त पकड घेऊ शकला असता. लिखाण आणि दिग्दर्शन दमदार असलं तरी  त्याची मांडणी थोडी आणखी पक्की झाली असती तर बरं झालं असतं असं चोखंदळ प्रेक्षकाला वाटल्याशिवाय राहणार नाही. अर्थात सिनेमाचे संवाद छान आहेत. सिनेमाच्या धाटणीनुसार खूप बोजड किंवा प्रेक्षकांवर शब्दाचे घण न घालताही प्रभावीपणे ते आपलं काम करतात. तसंच गावचं वातावरण, तिथल्या राजकीय हालचालींचा पट, छायांकन या गोष्टीही एकूण कथेला प्रभावी ठरवतात. व्यक्तिरेखा ज्या पद्धतीने चितारल्या आहेत, त्यात कलाकारांच्या अभिनयाचा तर वाटा आहेच, पण दिग्दर्शकाचाही तितकाच हात आहे.

सिनेमा चांगला असला की, तो अधिक चांगला असता तर लज्जत वाढली असती अशी हूरहूर लागते. तसंच काहीसं ‘कागर’ बघताना वाटतं. ‘सैराट’ आणि ‘कागर’ हे दोन्ही वेगळे सिनेमे आहेत हे सिनेमा जसा पुढे जातो तसं पटायला लागतं. मुळात राजकारण पडद्यावर बघायला प्रेक्षकाला नेहमीच आवडतं आणि हा राजकीय पट प्रेक्षकावर योग्य तोच प्रभाव टाकतो. एखादा चांगला बुद्धिबळाचा डाव पाहिल्यासारखा ‘कागर’ प्रेक्षकाला मनोरंजक सिनेमाचा आनंद नक्कीच देतो.

दर्जा        :         ***

सिनेमा    :         कागर

निर्माता :         सुधीर कोलते, विकास हांडे, वायकॉम 18 स्टुडिओ

दिग्दर्शक  :       मकरंद माने

संगीत      :       एव्ही प्रफुल्लचंद्र

छायांकन   :      अभिजीत आबडे

कलाकार   :      रिंकू राजगुरू, शशांक शेंडे, सुहास पळशीकर, शुभंकर तावडे, विठ्ठल तावडे