भंडारा–गोंदियात आज ४९ केंद्रांवर फेरमतदान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना विशेष प्रतिनिधी । मुंबई

पालघर, भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघांत झालेल्या पोटनिवडणुकीतील मतदानाच्या दरम्यान ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीन बंद पडल्या होत्या. पालघरमध्ये बंद पडलेल्या मशीन बदलल्या, पण भंडारा-गोंदियामधील काही नादुरुस्त मशीन बदलल्या नाहीत अशा ४९ केंद्रांवर बुधवारी फेरमतदान घेण्यात येईल. दरम्यान, भंडारा-गोंदियातील मशीन्स बंद पडल्यावर मतदान थांबवण्याचा निर्णय जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांच्या अंगाशी आला असून त्यांची तडकाफडकी बदली झाली आहे.

पालघर आणि भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघांतील पोटनिवडणुकीत ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीन्स बंद पडण्याच्या प्रकारामुळे मोठा गोंधळ उडाला. मशीन्स बंद पडल्याने अनेक मतदान केंद्रांवर मतदार ताटकळत होते. अनेकजण तर मतदान न करताच घरी निघून गेले. त्यामुळे शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दोन्ही मतदारसंघांत फेरमतदानाची मागणी केली होती. पालघरमध्ये ईव्हीएम व व्हीव्हीपॅट बंद पडलेल्या मशीन्स नव्याने बसवल्यानंतर तेथे मतदान सुरळीत सुरू झाले, मात्र भंडारा-गोंदिया येथे ४०० हून अधिक व्हीव्हीपॅट मशीन्स बंद पडल्या. नवीन मशीन्स उपलब्ध झाल्या नाहीत. त्यामुळे ४९ मतदान केंद्रांवर मतदान बंद करण्याचा निर्णय घेतला. आता या ठिकाणी बुधवारी फेरमतदान घेण्यात येईल. भंडारा (१४), साकोली (४), अर्जुनी-मोरगाव (२), तिरोरा (८) आणि गोंदिया (२१) या विधानसभा मतदारसंघातील ही मतदान केंद्रे आहेत. या ठिकाणी सकाळी ७ ते सायंकाळी  ५ या वेळेत मतदान होईल.

जिल्हाधिकाऱयांची तडकाफडकी बदली

भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीदरम्यान बंद पडलेल्या ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीन्समुळे तेथे २१ मतदान केंद्रांवर मतदान बंद करण्याचा निर्णय गोंदियाचे जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांच्या चांगलाच अंगाशी आला आहे. मशीन्स बंद पडल्याने तेथे नव्याने मशीन्सची व्यवस्था करण्याऐवजी त्यांनी मतदान बंद केल्यामुळे त्यांची थेट बदली करण्यात आल्याचे बोलले जात आहे. त्यांच्या जागी नागपूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी कादंबरी बलकवडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.