रियाने असे घालवले तुरुंगातील ते 28 दिवस

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तब्बल 28 दिवसानंतर अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिला जामीन मंजूर झाल्यानंतर ती आपल्या घरी पोहचली आहे. दरम्यान, या 28 दिवसांच्या काळात भायखळा जेलमध्ये ती आपल्या सहकारी कैद्यांना योग शिकवित होती, अशी माहिती रियाचे वकिल सतीश मानशिंदे यांनी दिली.

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सतीश मानशिंदे यांनी वरील माहिती दिली. या 28 दिवसांच्या काळात स्वतःला सकारात्मक ठेवण्यासाठी रियाने विशेष प्रयत्न केले असल्याची माहिती देखील मानशिंदे यांनी यावेळी दिली.

ते पुढे म्हणाले, बऱयाच वर्षानंतर मी कोणत्या तरी माझ्या अशीलाला भेटण्यासाठी जेलमध्ये गेलो. रिया कोणत्या अवस्थेत आहे, हे मला पाहायचे होते. जेलमध्ये मला ती ठीक वाटली. तिने योग्यरित्या स्वतःची काळजी घेतली. जेलमध्ये ती इतर कैद्यांना योग शिकवून तिने आपला वेळ घालवला असल्याचे त्यांनी नमूद केले. मीडियाला रियामुळे टीआरपी मिळत असल्याने ते तिच्या मागे धावत आहेत. ते फेक न्यूज आणि बोगस न्यूज चालवित असल्याचा आरोप देखील त्यांनी केला.

‘आर्मी गर्ल’ असल्याने युद्धाप्रमाणे सामना केला
कोरोनामुळे रियाला घरचे जेवणदेखील मिळत नव्हते. त्यामुळे तिने स्वतःला बरेच सावरुन घेतले होते. इतर कैद्यांना ज्या सुविधा मिळत होत्या, त्या सुविधांमध्ये ती देखील राहिली. एक ‘आर्मी गर्ल’ असल्याने तिने या सर्व परिस्थितीचा युद्धाप्रमाणे सामना केला. आता जो कोण व्यक्ती तिचे नुकसान करु इच्छितो, त्यांना सडेतोड उत्तर देण्यासाठी ती तयार आहे. आपल्या मागे आपल्या कुटुंबाचे काय होईल, यासाठी ती घाबरली होती, असे त्यांनी यावेळी सांगितले.