
सलग तीन दिवसांतील 20 तासांच्या चौकशीनंतर अमली पदार्थविरोधी विभागाने (एनसीबी) आज अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिला ड्रग्ज सेवनासह इतर आरोपांखाली अटक केली. दरम्यान, रियाला एनसीबीने रात्री व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून न्यायालयात हजर केले. एनसीबीने तिचा रिमांड मागितला नाही. तेव्हा रियाचे वकील सतीश मानेशिंदे यांनी तिच्या जामिनासाठी अर्ज केला, पण तो न्यायालयाने फेटाळला आणि तिला 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवले.
रिया ही अभिनेता सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच ड्रग्ज तस्करीचा मुद्दा प्रकाशात आला होता. एनसीबीने चौकशी सुरू करताच रियासह तिचा भाऊ शौविक, सॅम्युअल मिरांडा, दीपेश सावंत यांची नावे समोर आली होती. एनसीबीने यापूर्वीच शौविक, मिरांडा आणि दीपेशसह आठ आरोपींना अटक केली आहे.
रिया चक्रवर्तीची एनसीबीकडून सलग तीन दिवस चौकशी सुरू होती. शौविक, मिरांडा आणि रियाची समोरासमोर बसवूनही चौकशी झाली. यात अनेक धक्कादायक खुलासे झाल्याने एनसीबीने आज रियाला अटक केली.
एनसीबी काय म्हणते?
रियाच्या जामिनाला विरोध करताना एनसीबीने न्यायालयात दावा केला की, रियाने दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीवर तपास होणे गरजेचे आहे. यावर मानेशिंदे यांनी एनसीबीने रियाची पूर्ण चौकशी केली आहे ही बाब निदर्शनास आणली. मात्र कोर्टाने जामीन अर्ज फेटाळून लावला. दरम्यान, रिया ही ड्रग सिंडिकेटची अॅक्टिव्ह मेंबर असून ती ड्रग्ज पेडलरच्या संपर्कात होती. तिच्या मार्फतच सुशांतला ड्रग्ज मिळायचे. पैसे रिया द्यायची. शोविक, मिरांडा आणि दीपेशकडे ड्रग्ज सापडले नाही, पण अब्दुल परिहार आणि जैद यांच्याकडून ड्रग्ज यायचे, असे एनसीबीने न्यायालयाला सांगितले.
तीन केंद्रीय यंत्रणा एका महिलेची पिळवणूक करतायत – अॅड. सतीश मानेशिंदे
देशातील तीन केंद्रीय तपास यंत्रणा मिळून एका महिलेची पिळवणूक करतायत. न्यायाची थट्टा चालवली आहे, अशी खंत रिया चक्रवर्तीचे वकिल अॅड. सतीश मानेशिंदे यांनी व्यक्त केली आहे. रिया अंमली पदार्थाच व्यसन असलेल्या मुलाच्या प्रेमात ती पडली हिच तिची चूक होती. ज्याला अनेक वर्षांपासून मानसिक आरोग्याच्या समस्येनं ग्रासलं होतं. जो मुंबईतील पाच अग्रगण्य मानसोपचार तज्ज्ञांच्या देखरेखीखाली होता. ज्याने बेकायदेशीर औषधी आणि ड्रग्जचं सेवनातून आत्महत्या केली, अशी प्रतिक्रिया सतीश मानेशिंदे यांनी अमली पदार्थविरोधी विभागानं केलेल्या कारवाईबाबत बोलताना दिली.
रिया कोरोना निगेटिव्ह
अटक केल्यानंतर रियाला वैद्यकीय तपासणीसाठी शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात नेण्यात आले. तिथे तिची कोरोना टेस्टही झाली. ती निगेटिव्ह आल्याचे सांगण्यात आले.
सुशांतच्या बहिणीविरोधात एफआयआर
वांद्रे पोलिसांनी आज सुशांतची बहीण प्रियंका सिंग, मीनू सिंग आणि दिल्लीतील राममनोहर लोहिया रुग्णालयाचे डॉक्टर तरुण कुमार यांच्याविरोधात एफआयआर दाखल केला आहे. रियाने सोमवारी यासंदर्भात तक्रार दाखल केली होती. सुशांतला आत्महत्येस प्रवृत्त करणे, फसवणूक आणि कट रचणे या कलमांखाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार हे प्रकरण आता सीबीआयकडे सोपवल्याचे पोलिसांनी सांगितले.
सुशांत सिंहच्या फार्म हाऊसची तपासणी
अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या पवना धरण परिसरातील फार्म हाऊसची अमली पदार्थ विरोधी पथकाकडून (एनसीबी) मंगळवारी तपासणी करण्यात आली. सुशांत सिंह याचा पवना धरणाजवळील पवनानगर परिसरात फार्म हाऊस आहे. हा बंगला त्याने भाडेतत्त्वावर घेतला होता. सुशांत सिंह याची मैत्रीण रिया चक्रवर्तीला मंगळवारी अटक करण्यात आली. दरम्यान, मुंबईहून एनसीबीचे पथक पवनानगर भागात मंगळवारी सकाळी पोहचले. पथकाकडून बंगला तसेच परिसराची तपासणी करण्यात आली. पवना बॅकवॉटर परिसरात हँगआऊट हे फार्महाऊस अभिनेता सुशांतिंसह राजपूत याने दोन वर्षांसाठी भाडेतत्वावर घेतले होते, अशी माहिती समोर येत आहे. तसेच तो अनेकदा रिलॅक्स होण्यासाठी याठिकाणी यायचा अशी माहिती समजली आहे.




























































