
रायगड जिल्ह्यात परतीच्या पावसाने हाहाकार माजवला असून या पावसाने शेतकऱ्यांचे बहरलेल्या भातपीकाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्याच्या डोळ्या देखत बहरलेले पीक भिजल्याने शेतकऱ्यांसमोर आता आर्थिक नुकसानीचे संकट उभे राहिले आहे. कृषी विभागाकडून मात्र अद्यापी शेतकऱ्याच्या झालेल्या भात शेतीच्या नुकसानीचे अद्यापही पंचनामे करण्यात आलेले नाहीत.
ऑक्टोबर महिना संपत आला तरी पाऊस अजून गेलेला नाही. परतीचा पाऊस अजूनही पडत असल्याने रायगडकर पाऊस कधी जाणार या विवंचनेत आहेत. शेतकऱ्यांनी पावसाळ्याआधी भात पेरणी केली. त्यानंतर उत्तम पाऊस पडल्याने भात पीकही बहरून आले. मात्र परतीचा पाऊस सतत पडत असल्याने शेतकऱ्यांनी भात कापणी सुरू केलेली नाही. पावसामुळे बहरलेले पीक पडले असल्याने नुकसान झाले आहे.
जिल्ह्यात काही भागात कापणी सुरू झाली आहे. मात्र पावसाने पीक भिजले असल्याने आतील भाताचा दाणा भिजला गेला आहे. त्यामुळे चांगले पीक येऊनही शेतकरी आता आर्थिक संकटात सापडला आहे. कृषी विभागाकडून अद्यापही भात शेतीच्या नुकसानीचे पंचनामे सुरू केलेले नाहीत. विधानसभा निवडणुकीत प्रशासन अडकले असल्याने शेतकऱ्यांना मात्र वाऱ्यावर सोडले असल्याचे चित्र तयार झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर पसरला आहे. प्रशासनाकडून लवकरात लवकर पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करीत आहेत.
शेतकऱ्यांनी चार महिने केलेली शेतीची मेहनत चांगली फळाला आली होती. भात पीक चांगले बहरले होते. मात्र पावसाने भात पीक भिजल्याने दाण्यांना मोड आले आहेत. त्यामुळे आता शेती करायची की नाही असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे. आधीच भाताचे उत्पन्न जिल्ह्यातील कमी होत चालले असताना नैसर्गिक पावसाच्या आपत्तीने शेतकरी राजा आता हवालदिल झाला आहे.
























































