
सुरगाण्याहून गुजरातमध्ये गेलेले भाताचे ट्रक हे आमचे नाहीतच, महामंडळाच्या गोदामातील भात हा राईस मिलमध्येच पोहोचला, असा बनाव रचला आहे. राईस मिल संचालकासह या घोटाळय़ात सहभागी टोळीकडून चौकशी समितीचीच दिशाभूल केली जात आहे. हे प्रकरण दडपण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
सुरगाण्याच्या गोदामातील भात (साळ) नाशिकला भरडाईसाठी येण्याऐवजी गुजरातला पोहोचल्याचा घोटाळाच चव्हाटय़ावर आला. आदिवासी विकास महामंडळाच्या चार सदस्यीय समितीकडून कालपासून याची चौकशी सुरू आहे. सुरगाण्याच्या गोदामातून भात घेऊन आलेले ट्रक हे 3 मे रोजी आपल्या नाशिकजवळील मिलमध्ये पोहोचले, असा खुलासा भात भरडाईचे पंत्राट घेतलेल्या मिल संचालकाने केला आहे. दुसरीकडे हे ट्रक या गोदामातून 28 एप्रिललाच रवाना झाले होते, असे महामंडळाच्या संबंधित अधिकारी, कर्मचाऱयांनी सांगितले.
- नाशिक-सुरगाणा प्रवासासाठी तीन-चार तासांचा अवधी लागत असताना हे ट्रक पोहोचण्यासाठी सहा दिवस का लागले, असा प्रश्न उपस्थित होतो. सुरगाण्यात बोहाडय़ाचा कार्यक्रम असल्याने दोन दिवस वाहन जाण्याला मार्ग नव्हता, असेही कारण पुढे केले जात आहे. ते कारण मान्य केले तरी 30 एप्रिल पिंवा 1 मेच्या दुपारीच मिलमध्ये ट्रक पोहोचणे आवश्यक होते. दोन-तीन दिवस हे ट्रक अज्ञात ठिकाणी उभे केले असतील तर त्याची माहिती महामंडळ, पुरवठा खाते यांना लेखी स्वरूपात दिली गेली होती का? त्याचे पुरावे आहेत का? अशी चर्चा होत आहे.
- सुरगाण्यात बोहाडा कार्यक्रमामुळे रात्रीच्या वेळी नागरिक जागरूक असल्याने गुजरातच्या दिशेने ट्रक नेणे शक्य नव्हते, म्हणून ते अज्ञात ठिकाणी थांबवून ठेवले असावेत. सोयीच्या दिवशी व रात्रीच्या वेळी ते गुजरातमध्ये नेण्यात आले हेच खरे आहे. नाशिकमध्ये संबंधित मिलमध्ये भाताचे ट्रक पोहोचण्याचे सीसीटीव्ही फुटेज हे निर्धारित दिवस व वेळेतले नाहीत. प्रकरण चव्हाटय़ावर आल्यानंतर गोदामातून भाताचे ट्रक मिलमध्येच पोहोचल्याचा बनाव रचून चौकशी समितीची दिशाभूल करण्याचा प्रयत्न भ्रष्ट टोळीकडून सुरू आहे.