
जयस्तंभ ते कुवारबाव दरम्यान रिक्षातून प्रवास करताना एका विकृत रिक्षाचालकाने एका तरुणीशी अश्लील वर्तन केले. तिच्यासोबत घडलेला प्रसंग त्या तरुणीने सोशल मिडीयावर पोस्ट केला. त्यानंतर त्वरीत पोलीसांनी या प्रसंगाचे गांभीर्य ओळखून पुढील काही तासातच त्या रिक्षाचालकाला ताब्यात घेतले. त्याच्यावर रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
ही तरुणी घरी जाण्यासाठी जयस्तंभ येथे उभी होती. त्यावेळी ती कुवारबावला जाण्यासाठी एका रिक्षात बसली. जयस्तंभ ते कुवारबाव दरम्यान प्रवास करत असताना रिक्षाचालकाने तरुणीशी अश्लील वर्तन केले. घरी पोहोचल्यानंतर त्या तरुणीने सोशल मिडीयावर आपल्याला आलेला अनुभव पोस्ट केला. त्यानंतर आज सकाळी त्या तरुणीचे नातेवाईक आणि मित्रपरिवाराने रत्नागिरी पोलीस ठाण्यात जाऊन पोलीसांना याबाबतची खबर दिली. पोलीसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन दोन पथके तयार केली आणि पोलीसांनी त्या संशयीत रिक्षाचा शोध सुरु केला. पुढील काही तासातच रिक्षाचालक अविनाश म्हात्रे याला ताब्यात घेतले. त्याला शहर पोलीस ठाण्यात आणण्यात आले. त्याठिकाणी आरोपीची कसून चौकशी करण्यात आली. रिक्षाचालकावर भादवि कलम 354 (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांकडून महिलांना आवाहन
महिला दिवसा किंवा रात्री बस, रेल्वे किंवा रिक्षातून प्रवास करत असतील तर त्यांनी वाहनाचा नंबर नोंद करून ठेवावा आणि तो आपल्या पालकांकडे पाठवावा. प्रवासादरम्यान संशयीत व्यक्ती जर विकृत हालचाली करत असेल तर डायल 112 वर अथवा हेल्पलाईन क्रमांक 1091 तसेच रत्नागिरी पोलीस नियंत्रण व 02352 – 222222 वर संपर्क करावा. तसेच पोलीस दलाच्या ट्विटर हॅण्डल, फेसबुक, इन्स्टाग्राम, कू पेजवर आपण टॅग करू शकता, असे आवाहन पोलीसांनी केले आहे.




























































