चार वर्षाच्या चिमुरडीवर बलात्कार करणाऱ्या उरणच्या नराधमाला 10 वर्षाचा सश्रम कारावास

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । न्हावाशेवा

चार वर्षाच्या चिमुरडीवर बलात्कार करून तिला ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या नराधमाला अलिबाग सत्र न्यायालयाने 10 वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. रोहन राजेंद्र कासारे (23) असे या नराधम आरोपीचे नाव आहे.

मंगळवार ता.22 मे 2018 रोजी संध्याकाळी सवा सात वाजण्याच्या सुमारास नराधम आरोपीने खेळत असलेल्या या बालिकेला खाऊ देण्याच्या बहाण्याने आपल्या घरामध्ये नेऊन तिच्यावर बलात्कार केला होता. संध्याकाळी उशीरापर्यंत मुलगी घरी आली नाही म्हणून तिच्या काकानी तिचा शोध घेतला असता या आरोपीने या बालिकेवर बलात्कार करून दिवाणाच्या कप्प्यामध्ये लपविली होती. सुरूवातीला हा नराधम ही मुलगी आमच्या येथे आली नसल्याचा कांगावा करत होता. मात्र शेजारच्या एका बाईने हा आरोपीच या चिमुरडीला घेवून गेला असल्याचे पाहिले होते. त्यानंतर या मुलीच्या काकाने पुन्हा एकदा घरात जाऊन तपासले असता दिवाणाखाली मुलगी सापडली. दिवाण उघडल्यानंतर ही चिमुरडी सापडली. यावेळी तिच्या अंगावर कपडे नव्हते आणि ती बेशुद्ध अवस्थेत होती. तिच्या डोक्यावर आणि तोंडावर मार लागल्याच्या खुणा होत्या.

या प्रकरणी आरोपी रोहन राजेंद्र कासारे याच्यावर भादवि कलम 376 बालकांचा अत्याचार प्रतिबंधक कायदा पोस्को कलम 5, 6 नुसार गुन्हा दाखल केला होता. न्यायालयाने या प्रकरणी 12 साक्षीदारांची साक्ष नोंदवली. न्यायालयाने फिर्यादी साक्षीदार सुचिता कासारे, रासायनक विश्लेषक व वैद्यकीय अधिकारी यांची साक्ष महत्वाची धरून आरोपीला 10 वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. उरण पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरिक्षक शिवाजी काठे यानी या प्रकरणी महत्वाचा तपास केला तर शासकीय अभियोक्ता एड अश्विनी बांदिवडेकर-पाटील यांनी न्यायालयासमोर युक्तीवाद केला.