कोलकात्यात राडा; भाजप कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज

728

भाजप नेत्या रिमझिम मित्रा यांना अटक


पश्चिम बंगालमध्ये गेल्या काही दिवसांपासून शांत असलेले राजकीय वातावरण आज बुधवारी पुन्हा तापले. कोलकात्यात पोलीस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष उफाळून आला. कार्यकर्त्यांच्या आंदोलनादरम्यान झालेल्या झटापटीत पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. यात अनेक कार्यकर्ते जखमी झाले तर भाजप नेत्या रिमझिम मित्रा यांना अटक करण्यात आली. ‘बुलबुलचक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर पाहणी करण्यासाठी गेलेले केंद्रीय मंत्री आणि भाजप खासदार बाबुल सुप्रियो यांनाही टीएमसीच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवले.

अभिनेत्री आणि भाजप नेत्या रिमझिम मित्रा यांनी कोलकात्यात डेंग्यूमुक्त कोलकाता आणि इतर मागण्यांबाबत कोलकाता महानगरपालिकेसमोर निदर्शने केली. यावेळी मोठय़ा संख्येने भाजप कार्यकर्ते उपस्थित होते. आंदोलन तीव्र झाल्यामुळे पोलिसांनी कार्यकर्त्यांवर पाण्याच्या फवाऱयाचा माराही केला, परंतु आंदोलनाला वेगळे वळण लागले. पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाली. अखेर आंदोलनकर्त्यांना आवरण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला. आम्ही शांततेत आंदोलन करत होतो. आम्हाला निदर्शने करण्याची परवानगीही मिळाली होती. पुरुष पोलीस कर्मचाऱयांनी मला धक्काबुक्की केली आणि अटक केली असा आरोप मित्रा यांनी केला.

बाबुल सुप्रियो यांच्याविरोधात संताप

बुलबुलचक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या भागात पाहणी करण्यासाठी आणि तेथील नुकसानग्रस्त नागरिकांशी संवाद साधण्यासाठी गेलेल्या बाबुल सुप्रियो यांना तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवले. टीएमसीच्या कार्यकर्त्यांचा आक्रमक पवित्रा पाहून सुप्रियो यांना काढता पाय घ्यावा लागला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुप्रियो यांना पश्चिम बंगालमधील बुलबुलप्रभावित परिसराची पाहणी करण्याचे आदेश दिले.

आपली प्रतिक्रिया द्या