नगर शहरात दोन गटात दगडफेक; सहाजण जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नगर

शहरातील वंजारगल्ली भागात शुक्रवारी दुपारी दोन गटांमध्ये हाणामारी झाली. लहान मुलांचा गाडीला धक्का लागल्याच्या क्षुल्लक कारणावरून वाद वाढला. संतप्त जमावाने दोन दुचाकी जाळल्या. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली असून तणावाचे वातावरण आहे. आडतेबाजारासह वंजारगल्लीतील व्यापार्‍यांनी दुकाने बंद केली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. हाणामारीत जखमी झालेल्या सहाजणांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरु होते.

वंजारगल्ली भागात दुपारच्या सुमाराला लहान मुलांचा गाडीचा धक्का लागल्याच्या कारणावरुन हिंदू – मुस्लिमांच्या दोन गटात वाद झाला. वाद वाढल्याने आजुबाजूच्या परिसरातील माणसे जमा झाली. जमाव वाढल्यानंतर दोन गटात हाणीमारीला सुरुवात झाली. काहीजणांनी दगडफेकही केली. त्यामुळे परिसरात गोंधळ उडाळा. वंजारगल्ली व आडतेबाजारातील व्यापार्‍यांनी दुकाने तात्काळ बंद केली. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलीस घटनास्थळी पोहचेपर्यंत जमावाने दोन दुचाकींना आग लावली होती. घटनास्थळी अग्नीशमन दलालाही पाचारण करण्यात आले. अग्नीशमन दलाचे जवान घटनास्थळी येईपर्यंत गाड्या जळून खाक झाल्या होत्या. या हाणामारीत सहाजण जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी शासकीय रुगणालयात दाखल करण्यात आले आहे.

घटनेची माहिती मिळताच शहर विभागाचे पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके, तसेच कोतवाली पोलीस ठाण्याचे निरीक्षक नितीनकुमार गोकावे यांच्यासह त्यांचा फौजफाटा तात्काळ वंजारगल्ली दाखल झाला. पोलीस येतातच जमाव पांगला. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन दंगल नियंत्रण पथक, शीघ्र कृती दल घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तातडीने धाव घेतल्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आली. परिसरात तणाव असल्याने मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सीसीटीव्ही फूटेजद्वारे पोलिसांनी दोषींचा शोध सुरु केला असून एकाला ताब्यात घेण्यात आले आहे. लहान मुलांच्या किरकोळ वादातून हाणामारी झाल्याचे पोलिसांनी सांगितले.