
जालन्यातील टांगा स्टँड परीसरात दोन गटात मंगळवारी सकाळी तुफान हाणामारी झाली. या हाणामारीत एका गटाने दुसऱ्या गटातील एकाला तलवारीने भोसकल्याने एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
या घटनेनंतर एका टोळक्याने परीसरात हुल्लडबाजी करून सराफा बाजारात दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. या भागासह टांगा स्टँड परिसरात तणावपूर्ण शांतता असून या भागातील व्यापाऱ्यांनी दुकाने बंद केली आहेत. मंगळवारी सकाळच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत टांगा स्टँड परीसरात बंदोबस्त वाढवला. सध्या या भागात पोलिसांचा बंदोबस्त असून परिसरात तणावपूर्ण शांतता आहे. परिस्थिती निवळत असल्याने बंद असलेली दुकाने उघडण्यात येत आहे.
अप्पर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख, उपविभागीय पोलीस अधिकारी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुभाष भुजंग, सदर बाजारचे ज्ञानेश्वर पायघन, कदीमचे सहायक पोलीस निरीक्षक महेश टाक व वरिष्ठ पोलीस निरीक्षक घटनास्थळी दाखल झाले असून पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. पोलिसांच्या आवाहनावर दुकाने उघडण्याची प्रक्रिया सुरू झाली असून बाजार पुन्हा रुळावर येत आहे.




























































