महाराष्ट्रात दंगली उसळतील असं दबक्या आवाजात बोललं जातंय! अजित पवार यांनी दिला सावधगिरीचा इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्रात दंगली उसळतील असं दबक्या आवाजात बोललं जात आहे, असा सावधगिरीचा इशारा देतानाच विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी, गृहमंत्री म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृहखात्यावर वचक ठेवला पाहिजे, असे सुनावले. दरम्यान, आजकाल काय वक्तव्ये केली जात आहेत ते आपण पाहतो. सत्ताधारी जाणीवपूर्वक महागाई, बेरोजगारी, शेतकऱयांच्या प्रश्नांवरून लक्ष विचलित करत आहेत, असे त्यांनी सांगितले.

कोल्हापूर दौऱ्यावर असलेले अजित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी पत्रकारांनी एका विधवा महिलेवर अत्याचार झाल्याची बाब निदर्शनास आणून देताच अजित पवार म्हणाले, ज्यांच्या हातात सरकार असते त्यांनी प्रशासनावर जरब बसविली पाहिजे. गृहखाते सांभाळणाऱ्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या खात्यात आदरयुक्त दबदबा निर्माण केला पाहिजे. पोलीस खात्यात चुकीचे वागणाऱ्याला भीती वाटली पाहिजे. त्याला तिथल्या तिथे शासन झाले पाहिजे. त्यामध्ये कोणताही राजकीय हस्तक्षेप होता कामा नये.

राज्यात दंगली उसळतील असं दबक्या आवाजात बोललं जात आहे, असा सावधगिरीचा इशारा अजित पवार यांनी दिला. ज्यांनी त्यांनी आपल्या जाती, धर्माचा आणि पंथाचा अभिमान जरूर बाळगावा; परंतु इतर जाती, धर्म, पंथाचा अनादर होईल पिंवा द्वेषभावना निर्माण होईल असे कृत्य कोणीही करू नये, असे आवाहन त्यांनी केले.

‘त्यांनी’ महागाई कमी होणार का? रोजगार मिळणार का? यावर बोलावे
भाजप नेते, मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राष्ट्रवादीचे आमदार फुटून भाजपमध्ये येणार असल्याचा दावा काही दिवसांपूर्वी केला होता. याकडे लक्ष वेधले असता अजित पवार म्हणाले, कोण कुठल्या पक्षात जाणार याचे सतत दावे करणाऱयांनी महागाई कमी होणार का? तरुणांना रोजगार मिळणार का? पेट्रोल-डिझेलचे दर कधी कमी होणार? या जनतेच्या प्रश्नावर बोलावे.

दोन हजाराची नोट अचानक बंद करण्याचे कारण काय?
अचानक दोन हजाराची नोट बंद केली. श्रीमंत लोकांकडे असेल, पण गरीबांकडे पण दोन हजाराची नोट जपून ठेवली असेल ना? सारखे सारखे निर्णय का बदलले जातात? अचानक नोटबंदीचे कारण काय? असा सवाल त्यांनी केला. हा निर्णय देशहिताच्या दृष्टीने असेल तर ठीक आहे. यापूर्वी नोटाबंदी झाली तेव्हा लोकांना खूप सहन करावे लागले होते. यावेळी नोटा बदलण्यासाठी सप्टेंबरपर्यंत मुदत आहे. त्यामुळे लोकांना त्रास होईल असे वाटत नाही, असेही त्यांनी सांगितले.