कसोटीत पंतची पावले महानतेकडे, सौरभ गांगुलीचा विश्वास

ऋषभ पंत  तब्बल दोन वर्षांनंतर कसोटी क्रिकेटमध्ये पुनरामगन करणार आहे आणि कसोटी संघात त्याची निवड होताच माजी कसोटी कर्णधार सौरभ गांगुलीने त्याची पावले महानतेच्या दिशेने पडत असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे. त्याचा खेळ पाहून तो लवकरच कसोटीचा महान फलंदाज होऊ शकतो, असेही वक्तव्य केले.

कोलकाता येथे एका कार्यक्रमादरम्यान गांगुली म्हणाला, ‘पंत कसोटी क्रिकेटमध्ये मोठा फलंदाज बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे, पण त्याला छोटय़ा फॉरमॅटमध्ये सुधारणा करण्याची गरज आहे.’ हिंदुस्थानचा धडाकेबाज फलंदाज आणि यष्टिरक्षक ऋषभ पंत 2022 च्या वर्षाअखेरीस कार अपघातात जखमी झाला आणि त्याला तब्बल दीड वर्षासाठी क्रिकेटमधून दूर राहावे लागले. तब्बल दीड वर्षाने आयपीएलमधून क्रिकेटमध्ये परतला. टी- 20 विश्वचषक जिंकणाऱ्या संघातही तो होता. आता प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर त्याला अपेक्षेप्रमाणे कसोटी संघातही स्थान देण्यात आले आहे. बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी त्याची निवड करण्यात आली आहे. दोन वर्षांपूर्वी तो बांगलादेशविरुद्धच आपला शेवटचा कसोटी सामना खेळला होता. पंतचा खेळ पाहता तो हिंदुस्थानच्या सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक असल्याचे माझे प्रामाणिक मत आहे. तो पुनरागमन करतोय आणि संघासाठी कसोटी खेळत राहिल याबाबत मला जराही काwतुक आणि आश्चर्य वाटत नाही, असेही गांगुली अभिमानाने म्हणाला. तो असाच खेळत राहिला तर तो कसोटीत सर्वकालीन महान खेळाडू बनेल. फक्त त्याला टी-20 च्या छोटय़ा फॉरमॅटमध्ये थोडीशी सुधारणा करण्याची गरज आहे. त्याच्याकडे जी प्रतिभा आहे, तो काही काळाने सर्वोत्कृष्ट फलंदाज असेल.

गांगुलीने शमीबद्दलही आपला विश्वास व्यक्त केला. दुखापतीतून पूर्णपणे न सावरल्यामुळे त्याला या दौऱ्यात त्याला स्थान मिळाले नाही, पण तो ऑस्ट्रेलियन दौऱ्यात नक्कीच दिसेल. संघाची खरी कसोटी तिथेच आहे. पुढच्या वर्षी जुलैमध्ये इंग्लंडचाही दौरा आहे.