ऋषभ पंत फिट; आता आयपीएलमध्ये खेळणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बीसीसीआयने आज हिंदुस्थानी क्रिकेटप्रेमींना एक आनंदाची बातमी दिली. कार अपघातात गंभीर जखमी झाल्यामुळे गेले 15 महिने मैदानाबाहेर असलेला ऋषभ पंत फिट झाल्याची माहिती बीसीसीआयने आज दिली. त्यामुळे दिल्ली पॅपिटल्सचा कर्णधार असलेल्या ऋषभ पंतला पूर्णतः फिट घोषित करण्यात आले आहे. मात्र गुजरात टायटन्सचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आणि राजस्थान रॉयल्सचा प्रसिध कृष्णा या हंगामातील टी-20 लीगमध्ये सहभागी होऊ शकणार नाहीत. त्यामुळे या संघांना मोठा धक्का बसला आहे.

मुंबई इंडियन्सला धक्का
आयपीएल टी-20 क्रिकेट स्पर्धेच्या 17 व्या हंगामास 22 मार्चपासून प्रारंभ होणार आहे. याआधी मुंबई इंडियन्स संघाला मोठा धक्का बसला आहे. मीडियाच्या दाव्यानुसार स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव पहिल्या दोन सामन्यांमधून बाहेर जाऊ शकतो. सध्या तो राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत (एनसीए) पुनर्वसन प्रक्रियेतून जात आहे. पुनरागमन करण्यासाठी तो खूप मेहनत घेत आहे. मुंबईचा पहिला सामना 24 मार्चला गुजरात टायटन्सविरुद्ध, तर दुसरा सामना सनरायझर्स हैदराबादविरुद्ध (27 मार्च) होणार आहे. या दोन सामन्यांपूर्वी एनसीएचे वैद्यकीय पथक सूर्याला फिटनेस प्रमाणपत्र देईल की नाही, याबाबत शंका आहे.