‘पंत स्वतःची तुलना धोनीशी करू लागला, म्हणून त्याचा…’, निवड समितीच्या माजी प्रमुखांचा खुलासा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी गेल्या महिन्यात निवृत्त झाला. धोनीच्या निवृत्तीनंतर त्याच्या जागी कोण? असा प्रश्न निवड समितीला पडला आहे. टीम इंडियाकडे रिषभ पंत, के.एल. राहुल, संजू सॅमसन यासारखे चांगले पर्याय आहेत. यात पंतला त्याचा वारसदार मानले जात होते. मात्र त्याच्या अवसानघातकी खेळामुळे तो मागे पडत चालल्याचे दिसते. आता याला निवड समितीचे माजी प्रमुख एमएसके प्रसाद यांनीही एक खुलासा करत दुजोरा दिला आहे.

रिषभ पंतने दमदार कामगिरी करत टीम इंडियात स्थान मिळवले. धोनीच्या निवृत्ती नंतर त्याच्याकडे आता चांगली संधीही आहे. मात्र हा विस्फोटक फलंदाज स्वतःची तुलना धोनीशी करू लागला होता. त्यामुळे चांगल्या सुरुवाती नंतरही त्याचा गेम खराब झाला आणि त्याला उतरण लागली. एका स्पोर्ट्स वेबसाईटशी बोलताना एमएसके प्रसाद यांनी हा खुलासा केला.

पंत जेव्हा केव्हा मैदानात उतरायचा तेव्हा तेव्हा त्याची तुलना एम.एस. धोनीशी केली जायची. आणि यातच तो फसत गेला. याबाबत आम्ही त्याच्याशी अनेकदा चर्चा केली आणि स्वतःवर नियंत्रण ठेव असा सल्लाही दिला. तसेच स्वतःची तुलना धोनीशी करू नको असेही त्याला समजावले, खेळावर लक्ष केंद्रित कर असेही त्याला सांगितले, असेही एमएसके प्रसाद म्हणाले. पंतला धोनीच्या छायेतून बाहेर येण्याची गरज आहे, असा सल्ला देखील त्यांनी यावेळी दिला.

13 कसोटीत 814 धावा
रिषभ पंत 2018 ला ऑस्ट्रेलियाविरुद्ध आपला पहिला आंतरराष्ट्रीय कसोटी सामना खेळला होता. आतापर्यंत त्याने टीम इंडिया कडून 13 कसोटी सामने खेळले असून यात त्याने 38.76 च्या सरासरीने 814 धावा केल्या आहेत. यात त्याच्या 2 शतकांचा समावेश आहे. तर 2018 ला वेस्ट इंडिजविरुद्ध आपला पहिला वन डे खेळलेल्या पंतने आतापर्यंत 16 लढतीत 36.71 च्या सरासरीने 371 धावा केल्या आहेत. तसेच 27 टी-20 लढतीत 20.50 च्या सरासरीने 410 धावा केल्या आहेत.