
आपल्या झंझावाती फलंदाजीने खेळाचा प्रवाहच बदलून टाकणारा ऋषभ पंत परत येतोय. हिंदुस्थानच्या कसोटी संघात त्याच्या पुनरागमनाची शिट्टी वाजली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 14 नोव्हेंबरपासून कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर सुरू होणाऱया दोन सामन्यांच्या मालिकेसाठी त्याची निवड करण्यात आहे. बुधवारी झालेल्या निवड समितीच्या बैठकीत एन. जगदीशनला ‘थँक यू फॉर युवर सर्व्हिस’ म्हणत पंतसाठी दरवाजा उघडला गेला आहे.
जुलै महिन्यात इंग्लंडविरुद्ध मँचेस्टरमध्ये झालेल्या कसोटीत त्याच्या पायाला झालेल्या दुखापतीमुळे त्याला वेस्ट इंडीज दौऱयाला मुकावे लागले होते. पण हा पंत आहेच तसा थोडा हटके! गेल्या आठवडय़ात बंगळुरूच्या बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्सवर त्याने दक्षिण आफ्रिका ‘अ’ विरुद्धच्या सामन्यात दुसऱया डावात 90 धावांची तडाखेबंद खेळी करत हिंदुस्थान ‘अ’ला 275 धावांचे लक्ष्य गाठून दिले आणि तिथेच त्याने आपली फिटनेस, फॉर्म आणि ‘फायर’ तिन्ही गोष्टी सिद्ध केल्या.
दरम्यान, कसोटी कर्णधार शुभमन गिल, जसप्रीत बुमराह, नीतीश रेड्डी, अक्षर पटेल आणि वॉशिंग्टन सुंदर ही मंडळी सध्या ऑस्ट्रेलियात टी-20 मालिकेत खेळत आहेत. 8 नोव्हेंबरला ती मालिका संपल्यावर ते थेट कसोटी संघात दाखल होतील. तसेच कुलदीप यादवला तिसऱया सामन्यानंतर ‘होबार्ट ते होम’ एक्प्रेसने सोडण्यात आले आहे,
हिंदुस्थानचा कसोटी संघ
शुभमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (उपकर्णधार), यशस्वी जैसवाल, के. एल. राहुल, साई सुदर्शन, देवदत्त पडिक्कल, ध्रुव जुरेल, रवींद्र जाडेजा, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमरा, अक्षर पटेल, नितीशकुमार रेड्डी, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, आकाश दीप.




























































