
शहरात उन्हाचा चटका वाढू लागल्याने लिंबाच्या मागणीत मोठी वाढ झाली असून आवक घटल्यामुळे घाऊक बाजारात दर तेजीत आहेत. गेल्या पंधरा ते वीस दिवसांत लिंबाच्या दरात सुमारे २५ ते ३५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. सध्या किरकोळ बाजारात एका लिंबासाठी ७ ते ८ रुपये मोजावे लागत आहेत.
पुणे बाजार समितीच्या गुलटेकडी येथील मार्केटयार्डातील घाऊक बाजारात दर्जानुसार एका गोणीस १२०० ते २००० रुपये दर मिळत आहेत. आकारमानानुसार एका गोणीत साधारण ३०० ते ५५० लिंबे असतात. या गोणीचे वजन साधारण १५ ते २० किलो असते. सध्या बाजारात दररोज सुमारे १२०० ते १५०० गोणी लिंबाची आवक होत आहे. ही आवक प्रामुख्याने राशीण परिसरासह अहिल्यानगर आणि सोलापूर जिल्ह्यातून मुख्यत्वे लिंबाची आवक होत असून परराज्यांतील लिंबाचे प्रमाण अत्यल्प आहे. उत्पादक पट्ट्यात पाण्याची टंचाई जाणवत असल्याने उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे पुढील काळात आवक आणखी घटण्याची शक्यता असल्याची माहिती मार्केटयार्डातील लिंबाचे आडतदार मिलिंद जाधव यांनी वर्तविली.
दरम्यान, वाढत्या उष्णतेमुळे शहरातील सरबत विक्रेते, रसवंती गृहे तसेच घरगुती ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणात खरेदी होत आहे. मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी असल्याने येत्या काही आठवड्यांत दरात आणखी वाढ होण्याची शक्यता व्यापार्यांनी व्यक्त केली आहे.

































































