
>> रितेश पोपळघट
शेतीतील यांत्रिकीकरण ते कौशल्य आधारित शेती प्रयोगांची माहिती, शेतीविषयक स्टार्टअप, शेती सहकारातील मॉडेल्स अशा विविध माहितींवर आधारित हे सदर.
गेल्या काही वर्षांत सोशल मीडियावर शेतीतील यशोगाथांचा अक्षरश महापूर आला आहे. कुणीतरी आपली आयटीची नोकरी सोडून शेतीत करोडो रुपये कमवत आहे, कुणी करोडपती उद्योगपती गावात शेती करत आहे, कुणी रिटायर होऊन लाखो रुपयांची उलाढाल करत आहे, तर कुणी परदेशातील सुखी जीवन सोडून भारतात येऊन शेतीत यश मिळवत आहे. अशा अनेक यशकथा सतत न्यूज पोर्टल्स आणि सोशल मीडियावर वाचायला मिळतात.
या कथांनी प्रभावित होऊन अनेक तरुण, रिटायर झालेले अधिकारी, तसेच अडचणीत असलेले किंवा कष्टातून उभे राहिलेले सर्वसामान्य शेतकरी शेतीत मोठी गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतात, पण या चमकदार जगामागे एक भीषण वास्तव लपलेले असते.
काही लोक मुद्दाम विशेष आकर्षण निर्माण करून शेती किती फायदेशीर आहे हे समाजाच्या मनावर बिंबवतात. रोज एका बाजूला शेतकरी आत्महत्यांच्या बातम्या येत असताना दुसऱया बाजूला करोडो कमावणाऱया शेतकऱयांच्या गोष्टी दाखवून शेतीतील संकटाचे गांभीर्य कमी करण्याचा प्रयत्न होतो. अशा कथांचा आणखी एक उद्देश असतो भाबडय़ा आणि नवीन लोकांना शेतीत ओढणे. ते मोठी गुंतवणूक करतात, पण अपेक्षित यश न मिळाल्याने तोटा सोसतात.
यशोगाथांमधील शेतकरी बहुतेकदा उच्चशिक्षित, सेवानिवृत्त अधिकारी किंवा परदेशातून परत आलेले असतात. त्यामुळे असा गैरसमज तयार होतो की, शेतीत यश मिळवण्यासाठी अशा बुद्धिमान आणि सधन लोकांचीच गरज असते. तोटय़ात असलेले किंवा आत्महत्या करणारे शेतकरी मेहनत करत नाहीत किंवा योग्य पद्धतीने शेती करत नाहीत असा चुकीचा निष्कर्ष काढला जातो. समाजात असा मतप्रवाह रुजवला जातो की, शेती तोटय़ाची नाही, पण बहुतेक शेतकऱयांना ती व्यवस्थित करता येत नाही.
या मार्केटिंगला भुलून अनेक जण अवाजवी गुंतवणूक करतात. कमी खर्चातही शेतीत फायदा मिळू शकतो, हे माहीत असूनही जास्त नफ्याच्या लालसेपायी कर्जबाजारी होतात. प्रत्येक शेतकऱयाची जमीन, पाणी, हवामान आणि परिस्थिती वेगळी असल्याने एकाचा प्रयोग दुसऱयाला उपयोगी पडेलच याची खात्री नसते.
पुण्यातील एका प्राध्यापकाने डाळिंब शेतीची यशोगाथा वाचली ‘8 एकरातून 60 लाख रुपये एका वर्षात.’ त्यांनी गावाकडील ओसाड जमीन तयार करून विहीर, ठिबक, पाईपलाईन यावर सुमारे 30 लाख रुपये खर्च केले. आठवडय़ाच्या शेवटी शेतीला भेट देत होते, पण मजुरांनी औषधे योग्य पद्धतीने न देता ती दुसऱयांना विकली. तीन वर्षांनी हिशोब पाहता 72 लाख रुपये खर्च होऊन काहीच उत्पन्न मिळाले नाही. ते प्राध्यापक तोटा सहन करू शकले, पण एखाद्या सामान्य माणसाची आयुष्यभराची कमाई नष्ट होऊ शकते.
दुसऱ्या एका शेतकऱयाने यूटय़ूबवर व्हिडीओ पाहून मत्स्यपालन सुरू केले. 13 हजार मासे तळ्यात सोडले, पण 60 हजार रुपये खर्चूनही एकही मासा हाती आला नाही. तसेच दुसऱयाचा अनुभव पाहून मिरची लागवड करणाऱया शेतकऱयाला रोगामुळे पीकच आले नाही आणि 60-70 हजारांचा तोटा झाला. हे पाहून स्पष्ट होते की, अशा प्रयोगांत फारच कमी लोक यशस्वी होतात.
याशिवाय सोशल मीडियावर शेतीविषयक ‘इन्फ्लुएन्सर’ नावाचा एक नवा प्रकार वाढला आहे. त्यांच्याकडे शेतीचे पक्के ज्ञान नसतानाही ते भावनिक आणि आकर्षक माहिती देतात, बोगस उत्पादने व कंपन्यांची जाहिरात करतात. इमू, कडकनाथ कोंबडी पालन, महोगनी किंवा जिरेनियम शेती अशा अनेक योजनांत शेतकऱयांचे नुकसान झाले आहे. म्हणून अशा योजनांत गुंतवणूक करण्यापूर्वी काही गोष्टींची पडताळणी करा. त्या उत्पादनाला खरोखर बाजारपेठ आहे का? व्यवसायाचे गणित काय आहे? निव्वळ नफा किती आहे? ती योजना चालवणाऱया कंपनीची कायदेशीर जबाबदारी काय आहे?
शेतीसारख्या व्यवसायात निव्वळ नफा मर्यादित आहे त्यापेक्षा जास्त होऊ शकत नाही. कुणी त्यापेक्षा जास्त नफा दाखवत असेल तर सावध व्हा. शेतीत जास्त पैसे मिळतात हा गैरसमज सोडून इतरांचे आंधळेपणाने अनुकरण करून आपले मनस्वास्थ्य आणि आर्थिक स्थैर्य धोक्यात घालू नका.
[email protected]
(लेखक शेतीक्षेत्रात शिक्षण व संशोधन करणाऱ्या ‘द फार्म’ या स्टार्टअपचे सहसंस्थापक आहेत.)






























































