रितू फोगटचा कुस्तीला “रामराम”; मिश्र मार्शल आर्टसमध्ये प्रवेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । चंदीगढ

हिंदुस्थानची नामवंत आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू आणि “दंगल”फेम कुस्ती प्रशिक्षक महावीर फोगट यांची कन्या रितू फोगट हिने कुस्तीला “रामराम” करीत मिश्र मार्शल आर्टस् क्रीडाप्रकारात प्रवेश करण्याचा धक्कादायक निर्णय घेतला आहे. रितूच्या या निर्णयामुळे हिंदुस्थानी कुस्ती महासंघाला मोठा धक्का बसला आहे.रितूच्या नव्या भूमिकेमुळे हिंदुस्थान एका प्रतिभावंत महिला कुस्तीपटूला मुकणार आहे.

24 वर्षीय रितू ही प्रसिद्ध कुस्तीपटू फोगट भगिनींपैकी एक आहे. रितुने 2017 मध्ये पोलंड येथील 23 वर्षांखालील सिनियर जागतिक कुस्ती स्पर्धेत रौप्यपदक पटकावले होते. तिच्या गीता ,बबिता आणि संगीता या भगिनींनी राष्ट्रीय -आंतरराष्ट्रीय कुस्ती क्षेत्रात चमकदार कामगिरी नोंदवली आहे.रितूच्या धक्कादायक निर्णयामुळे हिंदुस्थान टोकियो ऑलीम्पिकसाठीच्या एका बलाढ्य महिला कुस्तीगीराला मुकणार असल्याची प्रतिक्रिया हिंदुस्थानी कुस्ती महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे.रितुने कुस्ती सोडून मिश्र मार्शल आर्टस् ( एमएमए ) या खेळात जाण्याआधी महासंघाला विश्वासात घ्यायला हवे होते,अशी प्रतिक्रिया कुस्ती महासंघाने दिली आहे. “रितूला टोकियो ऑलीम्पिकमध्ये देशासाठी कुस्तीचे पदक मिळविण्याची सुवर्णसंधी होती. पण तिने अचानक कुस्ती सोडून मिश्र मार्शल आर्टस् या व्यावसायिक खेळात जाण्याचा निर्णय घेतल्याने आम्हाला मोठा धक्का बसला आहे.रितूसारख्या प्रतिभाशाली महिला कुस्तीगीराला आपण मुकणार आहोत याचेच दुःख आहे असे हिंदुस्थानी कुस्ती महासंघाचे सहायक सचिव विनोद तोमर यांनी सांगितले.

मला एमएमए विश्वविजेती बनायचे आहे -रितू
माझ्या रक्तातच कुस्ती आहे ,माझ्या सर्व भगिनी कुस्तीत देशासाठी जागतिक स्पर्धांत चमकदार कामगिरी करीत आहेत .त्यामुळे माझ्याकडूनही कुस्तीत देशासाठी आणखी मोठी कामगिरी साकारली जावी अशा देशवासीयांच्या अपेक्षा आहेत. पण माझ्या अन्य बहिणींपेक्षा मी वेगळी आहे. मला देशाची पहिली एमएमए विश्वविजेती बनायचे आहे.तुम्हाला माझी चमकदार कामगिरी पाहायची असेल तर मॅटवर पाहण्याऐवजी मार्शल आर्टसच्या पिंजऱ्यात पहा, असे निवेदन रितुने आपल्या हिंदुस्थानी चाहत्यांना केले आहे. मी सिंगापूरच्या इव्हॉल्व्ह फाईट टीममध्ये सामील झाली आहे.माझ्या नव्या जीवन प्रवासाबद्दल मी अतिशय उत्साही आहे असेही रितू म्हणाली.