
मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदी अखेर भाजपच्या रितू तावडे यांची बिनविरोध निवड झाली आहे, तर उपमहापौरपदी शिंदे गटाचे संजय घाडी यांचीदेखील बिनविरोध निवड झाली आहे. या निवडीची औपचारिक घोषणा 11 फेब्रुवारी रोजी पालिका सभागृहात करण्यात येणार आहे.
महानगरपालिकेची निवडणूक महायुतीत लढल्यानंतर भाजपचे 89 तर शिंदे गटाचे 29 नगरसेवक निवडून आले आहेत. त्यामुळे भाजप आणि शिंदे गटाकडून महापौर आणि उपमहापौर पदासाठी आज पालिका चिटणीस मंजिरी देशपांडे यांच्याकडे अर्ज दाखल करण्यात आले. या पदांसाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी सायंकाळी 6 वाजेपर्यंतच्या मुदतीत इतर कोणत्याही पक्षाने महापौर, उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज सादर केला नसल्याने महापौर आणि उपमहापौर पद बिनविरोध निवडून आल्याचे स्पष्ट झाले.
संजय घाडी यांचेही अनेक पदांवर काम
उपमहापौर पदी बिनविरोध निवडून आलेले संजय घाडी यांनी शिवसेनाप्रणित भारतीय विद्यार्थी सेना, मुंबई विद्यापीठ स्टुडंट कौन्सिल अध्यक्ष, सिनेट सदस्य म्हणून काम केले आहे. तर मनसेमध्ये असताना राज्य सरचिटणीस पद भुषवले आहे. 2017 मध्ये ते पहिल्यांदा शिवसेनेकडून निवडून आले. त्यांना आता शिंदे गटाकडून निवडून आल्यानंतर उपमहापौर पदाची सवा वर्षासाठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे.


























































