
सामना प्रतिनिधी । मुंबई
डॉन दाऊद इब्राहिम आणि गँगस्टर छोटा शकील यांचा खासम्खास सहकारी रियाज भाटी याच्या मुंबई गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने मुसक्या आवळल्या आहेत. एमसीएचे सदस्यत्व मिळविण्यासाठी व्हिल्सन कॉलेजच्या ट्रस्टीची खोटी स्वाक्षरी व शिक्का मारून सदस्यत्व मिळविल्या प्रकरणात ही अटकेची कारवाई करण्यात आली. 2015 मध्ये भाटीने मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सदस्यत्व मिळवले होते. यासाठी त्याने विल्सन कॉलेजच्या ट्रस्टींची खोटी स्वाक्षरी व शिक्का मारून बेकायदेशीपणे एमसीएचे सदस्यत्व मिळवले. हा प्रकार ट्रस्टींच्या लक्षात येताच त्यांनी एमसीएशी संपर्प साधून भाटीचे सदस्यत्व रद्द करण्याची विनंती केली होती; परंतु एमसीएने तसे करण्यास नकार दिला होता. त्यामुळे ट्रस्टींनी भाटीला सदस्यत्व मागे घेण्यास सांगितल्यावर उलट भाटीने त्यांना धमकावले. काय करायचे ते करा असे सांगून त्यांना उडवून लावले. त्यामुळे ट्रस्टीने पोलिसांत भाटीविरोधात तक्रार दिली होती. याप्रकरणी खंडणीविरोधी पथकाने रियाज भाटी याला अटक केली आहे.
























































