
बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज दाखल करताच राष्ट्रीय जनता दलच्या (RJD) सासाराम मतदारसंघातील उमेदवार सत्येंद्र साहा यांना पोलिसांनी अटक केली. ही घटना सासाराम उपविभागीय कार्यालयात घडली, जिथे उमेदवारी अर्ज दाखल करताना झारखंड पोलिसांनी कारवाई केली. अटकेनंतर सत्येंद्र साहा यांना झारखंड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून त्यांना गडवा येथील न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. या घटनेमुळे सासारामच्या राजकीय वातावरणात खळबळ उडाली असून, आरजेडी कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सत्येंद्र साहा हे बिहारमधील करगहर पोलीस ठाणे परिसरातील रहिवासी आहेत. त्यांच्या विरुद्ध अनेक गुन्हेगारी खटले दाखल आहेत. ही अटक २००४ मध्ये झारखंड मधील गडवा तहसील क्षेत्रात घडलेल्या २१ वर्ष जुन्या दरोडा प्रकरणाशी संबंधित आहे. या प्रकरणात गडवा कोतवाली पोलिसांनी जारी केलेल्या वॉरंटनुसार ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी स्पष्ट केले की, ही कारवाई केवळ न्यायालयाच्या आदेशानुसार झाली असून याचा निवडणुकीशी काहीही संबंधित नाही.