लालूप्रसाद यादव यांचा मोठा निर्णय, मोठ्या मुलाची पक्ष आणि कुटुंबातून केली हकालपट्टी

राजदचे प्रमुख आणि माजी केंद्रीय मंत्री लालूप्रसाद यादव यांनी त्यांचा मोठा मुलगा तेजप्रताप यादव यांच्यावर मोठी कारवाई केली आहे. लालूप्रसाद यादव यांनी मुलगा तेजप्रताप यादव यांना पक्ष आणि कुटुंबातून 6 वर्षांसाठी बाहेर काढलं आहे. X वर एक पोस्ट करत लालू यांनी याबाबत माहिती दिली आहे.

X मध्ये आपल्या पोस्टमध्ये लालूप्रसाद यादव यांनी लिहिलं आहे की, “खाजगी जीवनात नैतिक मूल्यांकडे दुर्लक्ष केल्याने सामाजिक न्यायासाठीचा आपला सामूहिक संघर्ष कमकुवत होतो. माझ्या मोठ्या मुलाच्या कृती, सार्वजनिक वर्तन आणि बेजबाबदार वागणूक ही आमच्या कौटुंबिक मूल्यांशी आणि संस्कारांशी सुसंगत नाही. त्यामुळे वरील परिस्थितीमुळे मी त्याला पक्ष आणि कुटुंबापासून दूर करत आहे. यापुढे पक्ष आणि कुटुंबात त्याची कोणतीही भूमिका राहणार नाही. त्यांना पक्षातून 6 वर्षांसाठी काढून टाकण्यात आले आहे.”

लालूप्रसाद यादव यांनी आपल्या पोस्टमध्ये पुढे लिहिलं आहे की, “त्याच्या खासगी जीवनातील चांगले-वाईट आणि गुण-दोष यांचा विचार करण्यास तो स्वतः सक्षम आहे. त्याच्याशी संबंध ठेवणारे लोकांनी आपल्या विवेकबुद्धीने निर्णय घ्यावेत. मी नेहमीच सार्वजनिक जीवनात लोकलज्जेचा पुरस्कार केला आहे. कुटुंबातील इतर आज्ञाधारक सदस्यांनीही सार्वजनिक वावरताना याच मूल्याचा स्वीकार केला आणि आचरणातही आणले.”

काय आहे प्रकरण?

दरम्यान, तेजप्रताप यादव यादव आणि त्यांची प्रेयसी अनुष्का यादव यांच्याशी संबंधित प्रकरणाबाबत लालूप्रसाद यादव यांनी ही कारवाई केली आहे. 24 मे रोजी तेजप्रताप यादव यांच्या फेसबुक अकाउंटवरून एक फोटो शेअर करण्यात आला होता. या फोटोत तेजप्रताप यादव एका मुलीसोबत दिसत होते. त्या मुलीचे नाव अनुष्का यादव असल्याचे सांगण्यात येत आहे. पोस्टमध्ये लिहिले होते की, तेजप्रताप यादव हे अनुष्का यादव यांच्यासोबत 12 वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. नंतर ती पोस्ट डिलीट करण्यात आली. काही तासांनंतर तेजप्रताप यांनी X वर एक पोस्ट करत सांगितलं की, त्यांचे अकाउंट हॅक झाले आहे. हा फोटो एआयच्या (AI) मदतीने तयार करण्यात आला आहे.