
तब्बल 17 वर्षांहून अधिक काळापासूनअपूर्ण असलेल्या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील (एनएच 66) अडथळे, रखडलेली कामे, जीवघेणे खड्डे, धोकादायक वळणे आणि अपघातप्रवण ठिकाणे यांचा प्रत्यक्ष अभ्यास करून शासनापर्यंत खरी वस्तूस्थिती पोहोचवण्यासाठी रायगड जिल्ह्यातील तरुण अभियंता चैतन्य पाटील (गाव कासू, पेण) यांनी एक आगळीवेगळी मोहीम (पदयात्रा) सुरू केली आहे. त्यांनी या मोहिमेला अर्थपूर्ण नाव दिलंय ‘रस्ता सत्याग्रह पायी पाहणी मोहीम’… ही यात्रा 9 ऑगस्ट रोजी पनवेल, पळस्पे फाटा येथून सुरू झाली असून रायगड-रत्नागिरीमार्गे सिंधुदुर्ग पर्यंत चालणार आहे. मंगळवारी चिपळूण येथे शिवसेना नेते आमदार भास्कर जाधव यांची भेट घेऊन चैतन्य यांनी पुढचा टप्पा संगमेश्वरच्या दिशेने सुरू केला. चैतन्याच्या या धाडसाचे भास्कर जाधव यांनी कौतुक करत त्यांच्या पाठीवर थाप देऊन ‘लढत राहा’ असा सल्ला दिला.
गेल्या दहा-बारा वर्षात मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर हजारो निष्पाप नागरिकांना अपघातांत जीव गमवावा लागला, तर अनेकांना आयुष्यभरासाठी अपंगत्व आलं. उध्वस्त कुटुंबांची हकीकत ही केवळ आकड्यांत मावणारी नाहीं, ती कोकणातील प्रत्येक नागरिकाच्या मनात आजही ठसलेली जखम आहे. या वास्तवाला थेट भिडत चैतन्य पाटील यांनी शासनाला संपूर्ण, तपशीलवार अहवाल सादर करण्याचा संकल्प केला आहे. त्यांच्या अभ्यासात महामार्गावरील खड्डे व खराब रस्ते, पाणी साचणारी धोकादायक ठिकाणे, अपघातप्रवण ब्लॅक स्पॉट्स, दिशादर्शक व सूचना फलकांची स्थिती, स्थानिकांच्या अडचणी व सूचनाही सर्व माहिती जीपीएस लोकेशन, छायाचित्रे व अहवालासह शासनापर्यंत पोहोचवली जाणार आहे.
महामार्गावरील अपघातांची शासनाकडील अधिकृत आकडेवारी मांडली. 2012 ते 2025 दरम्यान महामार्गावरील अपघातांमध्ये झालेल्या हजारो मृत्यू, गंभीर जखमी, वाहतूक पोलिसांची कारवाई, वसूल केलेला दंड आणि अपघातांची संपूर्ण माहिती त्यांनी दस्तऐवजांसह सादर केली. यावेळी आमदार भास्कर जाधव यांना भेटून कोकणातील सर्व आमदारांनी एकत्रितपणे सरकारला आवाज द्यावा अशी विनंती केली.
महामार्गावरील अपघातात तडफडणारे जीव पाहिल्यानंतर पेटून उठणान्या चैतन्य पाटील यांनी या मोहिमेचे स्वखर्चातून आयोजन केले. कुणाकडूनही आर्थिक मदत नाही. सुरक्षेसाठी एक मित्रवाहन सोबत घेऊन ते बाहेर पडले. या पदयात्रेतील प्रवासादरम्यान ते मार्गावरील गावकऱ्यांशी थेट संवाद साधून त्यांच्या अडचणींची नोंद करत आहेत. चैतन्य पाटील हे मंगळवारी पदयात्रा करत चिपळूणात पाहोचले. महामार्गावरील पॉवर हाऊस दरम्यान ते चालत असतानाच शिवसेना नेते, आमदार भास्कर जाधव यांनी त्यांना पाहिले आणि आपली गाडी थांबवली. त्यांनी गाडीतून खाली उतरत चैतन्यच्या प्रवासाची, तब्येतीची, राहण्या-खाण्याचीही अगदी आत्मियतेने विचारपूस करत शाब्दिक बळ दिले. त्यानंतर या पदयात्रेत त्यांनी सहभागी होत रस्ता सत्याग्रहाला आपलाही पाठिंबा दर्शविला. एका तरूणाला महामार्गावरील सुरक्षित प्रवासासाठी अशा प्रकारचे आंदोलन करावे लागतेय. याबद्दल त्यांनी केंद्र व राज्य शासनाच्या कार्यपध्दतीवर कठोर भाषेत संताप व्यक्त केला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी रोज एक थाप मारतात, त्यांची फक्त मोठ-मोठी भाषणं ऐकायची मात्र काम काहीही नाही, असा चिमटाही त्यांनी काढला.
नागरिकांना भावनिक आवाहन ही पदयात्रा केवळ माझ्या पावलांची नाही, तर प्रत्येक नागरिकाच्या सुरक्षित भविष्याची वाटचाल आहे. महामार्ग अपघातमुक्त व्हावा यासाठी आपण सर्वांनी या मोहिमेचा भाग व्हावे, असे हृदयाला भिडणारे आवाहन चैतन्य पाटील यांनी केले.दरम्यान, मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील समस्यांचा प्रत्यक्ष आढावा घेऊन शासनाला जबाबदारीची जाणीव करून देण्यासाठी एका तरुणाने सुरू केलेली ही पदयात्रा खरोखरच ऐतिहासिक आणि हृदयस्पर्शी ठरत आहे. या रस्ता सत्याग्रह मोहिमेमुळे तरी शासन आणि प्रशासन जागे होईल, अशी कोकणातील सर्वसामान्य नागरिकांनी व्यक्त केली आहे.