रस्ते कामांच्या राजकारणावरून स्थायी समितीत भाजप तोंडघशी!

423

मुंबईत ‘कोरोना’चा धोका वाढल्यामुळे रस्त्यांची कामे तातडीने पूर्ण करणे गरजेचे असताना भाजपच्या नगरसेवकांनी स्थायी समितीत नाहक राजकारण करीत प्रस्तावांना विरोध केला. मात्र आपत्कालीन स्थितीत ही कामे तातडीने पूर्ण होणे आवश्यक असल्याचे सांगत शिवसेनेने चोख प्रत्युत्तर देऊन 828.22 कोटींचे प्रस्ताव बहुमताने मंजूर केले.

मुंबईकरांना दर्जेदार रस्ते देण्यासाठी पालिका प्रशासनाकडून कोटय़वधीचे प्रस्ताव स्थायी समितीत मंजुरीसाठी मांडण्यात आले. यामध्ये मुंबईतील अनेक रस्ते उखडून ठेवले असल्याने, काही रस्त्यांच्या ड्रेनेज लाइन ओपन असल्याने रोगराई पसरण्याचा धोका असल्याने हे प्रस्ताव तातडीने मंजूर करावेत अशी विनंती स्थायी समितीला प्रशासनाकडून करण्यात आली. पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी याबाबत स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांना पत्र देऊन ‘शहर विभागातील विविध प्रभागांमधील रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण करणे, रस्त्याच्या साइड स्ट्रिप आणि सीसी पॅसेजची सुधारणा करण्या’चे प्रस्ताव मंजूर करण्याची लेखी विनंतीही केली. स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी तशी माहितीही सर्व सदस्यांना दिली. मात्र भाजपच्या सदस्यांनी रस्ते कामांची कोणतीही तातडीची गरज नसल्याचे सांगत ‘कोरोना’च्या नावाखाली प्रशासन दिशाभूल करीत असल्याचा आरोप केला. यावेळी काँग्रेस, राष्ट्रवादीनेदेखील भाजपच्या हरकतीच्या मुद्दय़ाला समर्थन देत प्रस्ताव मंजूर करण्याची घाई करू नये अशी मागणी केली. रस्त्याच्या कामांचे पाच प्रस्ताव बहुमताने मंजूर झाल्याची घोषणा स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी केली. यावेळी भाजपच्या सदस्यांनी सभात्यागही केला. मात्र सभात्याग म्हणजे भाजपची नौटंकी असल्याचा आरोप यशवंत जाधव यांनी केला.

शहर विभागातील रस्त्यांची कामे मार्गी
– सी – 270 शहर विभागाच्या विभाग-2 मधील ‘एफ/दक्षिण’, ‘एफ/उत्तर’,
‘जी/दक्षिण’, ‘जी-उत्तर’ विभागातील विविध रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरणाद्वारे मजबुतीकरण, सुधारणा – 215.60 कोटी
– सी-272 शहर विभागातील विभाग – 2 मधील ‘एफ/दक्षिण’, ‘एफ/उत्तर’,
‘जी/दक्षिण’, ‘जी/उत्तर’ व ई विभागातील मुख्य रस्त्यांसह छोटय़ा रस्त्यांची दुरुस्ती-मजबुतीकरण – 208.97 कोटी
– सी – 271 शहर विभागातील ए, बी, सी, डी व ई विभागातील विविध रस्त्यांचे सिमेंट काँक्रीटने मजबुतीकरण, सुधारणा, परिरक्षण – 149.88 कोटी
– सी – 273 शहर विभागातील ए, बी, सी व डी विभागातील विविध रस्त्यांच्या साइड स्ट्रिपचे काँक्रिटीकरण, दुरुस्ती, सुधारणा, मजबुतीकरण – 157.55 कोटी
– पूर्व उपनगरातील ‘एन’ विभागातील विविध रस्त्यांची दुरुस्ती, मजबुतीकरण, सुधारणा आणि परिरक्षण करणे – 96 कोटी 20 लाख 81 हजार 713 रुपये.

आपली प्रतिक्रिया द्या