उरण शहरातील रस्ते बनले पार्किंग झोन

सूर्यकांत म्हात्रे, चिरनेर

उरण शहरात नुकतेच नव्याने बनविण्यात आलेल्या काँक्रिटच्या रस्त्यांवर बेजबाबदारपणे वाहने उभी केली जात असल्याने या रस्त्यांवरून चालणे मुश्किल झाले आहे. वाहतुकीला अडचण ठरणाऱ्या या बेजबाबदार पार्किंगमुळे उरण शहरातील हे रस्ते पार्किंग झोन झाल्याचे चित्र दिसून येत आहे.

उरण शहरातील रस्ते काँक्रीटीकरण करण्याचे काम सुरू झाले होते. सध्या पावसामुळे काम बंद आहे. काही रस्त्यांचे काँक्रिटीकरण झाले खरे, परंतु त्याचा वापर ये-जा करण्यासाठी होण्याऐवजी या रस्त्यांवर टू-थ्री-फोर व्हीलर बिनधास्तपणे पार्क केल्या जात आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.

आता दोन दिवसांवर गणरायाचे आगमन होणार आहे. त्यामुळे खरेदीसाठी नागरिकांची गर्दी बाजारपेठेत वाढत आहे. दिवसेंदिवस ही गर्दी वाढणार आहे. याचा विचार वाहतूक प्रशासनाने करून वेळीच उपाययोजना करावी अन्यथा वाहतूककोंडीचा प्रश्न गहन बनणार आहे. दररोज होणाऱ्या वाहतूककोंडी आमजनता वैतागली आहे. शहरातील रस्ते अशा बेजबाबदार पार्किंगने व्यापले जात असतील तर बाजारपेठेत येणाऱ्या जनतेने चालायचे तरी कुठून असा प्रश्न जनतेला पडत आहे. पर्यायाने अशा बेजबाबदार वाहन चालकांवर कारवाई करण्याची मागणी जनतेतून होत आहे.

summary- roads in uran became parking zone