सोनसाखळी चोरून पुण्याला सटकला, 300 हून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपीला पकडले

पादचारी महिलेच्या गळय़ातील सोन्याची चेन हिसकावून चोरटा दुचाकीवरून पसार झाला. पोलिसांना चकवा देण्यासाठी त्याने पुणे गाठले. परंतु जवळपास 350 सीसीटीव्ही फुटेज तपासून घाटकोपर पोलिसांनी मागोवा काढत त्या सोनसाखळी चोराच्या मुसक्या आवळल्या.

भटवाडी येथे राहणाऱया रंजना घुटुगुडे या महिला रस्त्याने जात असताना दुचाकीवरून आलेल्या चोराने त्यांची सोन्याची चेन हिसकावून पळ काढला. याप्रकरणी घाटकोपर पोलिसांत तक्रार दिल्यानंतर निरीक्षक दीपाली कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि ज्ञानेश्वर खरमाटे, पैलास तिरमारे व पथकाने तपास सुरू केला होता. पोलिसांनी घटनास्थळापासून तब्बल 350 सीसीटीव्ही फुटेज तपासले. तेव्हा आरोपी त्याच्या आंबेगाव येथील शिरोली गावी गेल्याचे समोर आले. आरोपी चाकणमार्गे एमआयडीसी तळेगावमार्गे येत असल्याचे निष्पन्न होताच त्याला एमआयडीसी पेट्रोल पंप येथे सापळा रचून पकडण्यात आले. आकाश लोखंडे असे त्या आरोपीचे नाव असून तोदेखील भटवाडी येथे राहतो. त्याच्याकडून चोरलेली सोन्याची चेन हस्तगत करण्यात आली आहे.