चोऱ्या करण्यासाठी गोवा-कोल्हापूर-गोवा वारी ,दोघांना अटक

तालुक्यातील उत्तूर येथून चोरीस गेलेल्या चारचाकीसह इतर दोन अशा एकूण तीन चारचाकी व या चारचाकींचा वापर करून अनेक ठिकाणी चोऱ्या करणाऱ्या दोघांना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. या वाहनांसह चोरीतील 17 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. आरोपी हे मूळचे राजस्थान राज्यातील असून, ते सध्या गोवा राज्यात राहतात. ते गोव्यातून चारचाकी इको गाडीतून रात्रीच्या वेळी कोल्हापूर येथे येऊन चोऱ्या करून परत जात असल्याचे निष्पन झाले आहे.

ईश्वरसिंह रणवीरसिंह राजपूत (वय 30, रा. ता. बागोडा, जि. जालोर, राजस्थान) व कृष्णकुमार राणाराम-देवासी (वय 27, रा. ता. गुड्डामालानी, जि. बाडमेर, राजस्थान) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

आजरा तालुक्यातील उत्तूर येथून चोरलेली मारुती इको गाडीतून दोन व्यक्ती कोल्हापूर ते कागल हायवेवरील कणेरी फाटय़ावर येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संजय गोर्ले यांना मिळाली होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक किरण भोसले यांच्या पथकाने सापळा लावून वरील दोघांना इको गाडीसह पकडले.

या दोघांकडे चौकशी केली असता, त्यांनी त्यांच्या इतर साथीदारांसह आजरा, गांधीनगर व करवीर पोलीस ठाणे हद्दीत घरफोडी, चोरी तसेच इको गाडय़ा चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली. त्यांच्या माहितीवरून त्यांच्या ताब्यातून चोरलेल्या तीन गाडय़ा तसेच घरफोडीतील साहित्य असा एकूण 17 लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजय गोर्ले, जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक तानाजी सावंत, सहायक पोलीस निरीक्षक किरण भोसले, पोलीस उपनिरीक्षक महादेव कुराडे व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.