
सामना प्रतिनिधी । कोपरगाव
शहरातील भर वस्तीत असलेल्या बँके रोडवरील शांतीलाल बोरा यांच्या घराचे कुलुप तोडून चोरट्यांनी लाखोंचा ऐवज लंपास केला आहे. प्रफुल्ल बोरा यांनी कोपरगाव शहर पोलीसांत तक्रार दिली असून कोपरगाव शहर पोलीसांनी अज्ञात चोरटयांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. रहदारीचा बँक रोड, सुर्या कॉम्पलेक्स् मधील तळमजल्यावर असणारी दुकाने त्यात असणारी गर्दी असे असतांना चोरट्यांनीनी पाळत ठेवून घरफोडी केल्याची चर्चा आहे. मात्र या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
सुर्या कॉम्प्लेक्स या इमारतीत प्रफुल्ल बोरा यांचे दोन फ्लॅट आहेत. पहिल्या मजल्यावर फिर्यादी प्रफुल्ल बोरा यांच्या आई चंदनबाला यांचा गेल्या वीस वर्षापासुन स्वतःहाच्या फ्लॅटमध्ये बेनटेक्स ज्वेलरीचा व्यवसाय आहे. 25 सप्टेंबर शांतीलाल व चंदनबाला बोरा हे कुटुंबीय पालदान, गुजराथ येथे देवदर्शनासाठी गेले होते. तेव्हा चोरट्यांनी डाव साधला असावा अंदाज व्यक्त होत आहे. 28 सप्टेंबर रोजी ही घटना उघडकीस आली.
चोरांनी एकूण 56 तोळे सोने वर 16 लाख 5 हजार रुपये रोकडवर डल्ला मारला. दरम्यान घटनेची माहिती मिळताच अपर पोलीस अधिक्षक श्रीरामपुर रोहिदास पवार व उपविभागीय पोलीस अधिकारी शिर्डी अभिजीत शिवथरे यांनी घटनास्थळाची पाहणी केली. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले. तपासाबाबत योग्य त्या सुचना कोपरगाव शहर पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांना केल्या असुन त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोसई भरत नागरे हे तपास करीत आहेत.































































