
सामना प्रतिनिधी । मुंबई
भारतीय कामगार सेनेचे सरचिटणीस जयवंत परब यांच्या इंडियन ऑइलनगर परिसरातील कार्यालयात सोमवारी रात्री चोरीची घटना घडली. चोरटय़ाने अंधाराचा फायदा घेत कार्यालयातल्या कपाटातील हजारो रुपये चोरून नेले. याप्रकरणी डी. एन. नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इंडियन ऑइलनगरसमोर परब यांचे कार्यालय आहे. सोमवारी सायंकाळी नेहमीप्रमाणे कार्यालय बंद करून परब व त्यांचे सहकारी घरी गेले. सकाळी कार्यालयात चोरी झाल्याची घटना समोर आली. चोरटय़ाने कार्यालयात घुसून कपाटातील तीस ते चाळीस हजार रुपये चोरून नेले. याप्रकरणी जयवंत परब यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोरटय़ाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. कार्यालय परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. परंतु रात्रीच्या अंधारात आरोपीचा चेहरा स्पष्ट दिसत नसल्याचे समोर आले आहे. पोलीस चोरटय़ाचा शोध घेत आहेत.




























































