
सामना प्रतिनिधी, पुणे
चोरीला गेलेले दागिने कोणीतरी घेऊन येईल अशी खात्री वाटत असल्याने फिर्यादीने तीन महिने पोलीस ठाण्यात तक्रारच दिली नसल्याचा अंचब्यात पाडणारा प्रकार घडला आहे. उघड्या दरवाजावाटे घरात प्रवेश करून चोरटयांनी कपाटातील दीड लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले. ही घटना 22 ऑक्टोबर 2018 रोजी घडली होती. मात्र याप्रकरणी रविवारी (दि. 20) वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
संजीव नरहरीराव जगताप (वय 53, रा. पाचपीर चौक, काळेवाडी) यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी जगताप यांच्या घरातून अज्ञात इसमाने 22 ऑक्टोबर 2018 रोजी 1 लाख 51 हजार 632 रुपयांचे दागिने चोरून नेले. मात्र, चोरीला गेलेले दागिने कोणीतरी घेऊन येईल अशी खात्री जगताप यांना वाटत असल्याने त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली नाही. घटनेला तीन महिने होत आले तरी कोणीही दागिने घेऊन आले नसल्याने शेवटी जगताप यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. वाकड पोलीस तपास करीत आहेत.
























































