आखात धगधगतेच, अमेरिकेच्या दूतावासाजवळ पुन्हा दोन रॉकेटचा मारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
trump

आखाती राष्ट्रांतील युद्धाचे संकट गडद होऊ लागले आहे. इराकची राजधानी बगदादमधील अमेरिकेच्या दुतावासाजवळ रविवारी रात्री उशिरा दोन रॉकेटचा मारा करण्यात आला. त्यामुळे अमेरिका आणि इराणमध्ये युद्ध पेटण्याची शक्यता बळावली असतानाच इराकने या आगीत तेल ओतले आहे. इतर देशांसह अमेरिकेच्या सैन्यांना आपल्या देशातून बाहेर काढण्याचा निर्धार इराकने केला आहे. त्यावर संतापून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराकलाही धमकी दिली आहे.

अमेरिकेने ड्रोन हल्ला करून इराणचे लष्करप्रमुख कासिम सुलेमानी आणि इराकचे वरिष्ठ लष्करी अधिकारी अबू महदी अल-मुहंदिज यांची हत्या केल्यानंतर आखाती राष्ट्रांत तणाव वाढला आहे. शनिवारी इराण समर्थक गटांनी अमेरिकन दुतावास आणि एअरबेसवर रॉकेट हल्ला केला. त्यानंतर सलग दुसऱया दिवशी रविवारी दोन रॉकेटचा मारा करण्यात आला. या वेळी तिसऱया रॉकेटचाही मारा केला गेला, परंतु ते रॉकेट दुतावास असलेल्या ग्रीन झोनच्या बाहेरील घरावर पडले. अमेरिका-इराणच्या या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर आपल्या देशातील 5200 अमेरिकन सैन्यांना बाहेर काढण्याचा निर्णय संसदेने घेतल्याचे इराकचे पंतप्रधान आदिल अब्दुल महदी यांनी सांगितले. विशेष म्हणजे, इराकच्याच सरकारने 2014 साली इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेशी लढण्यासाठी हे अमेरिकेचे सैन्य तैनात केले होते.

ट्रम्प यांच्या शिरच्छेदासाठी 5.67 अब्जचे बक्षीस

ट्रम्प यांनी इराणची इस्लामिक सांस्कृतिक ठिकाणे उद्ध्वस्त करणाची धमकी दिली आहे तर इराणने ट्रम्प यांच्या शिरच्छेदासाठी 5.67 अब्जचे बक्षीस जाहीर केले आहे. यासाठी इराणच्या नागरिकांकडून प्रत्येकी एक डॉलर गोळा केला जाणार आहे. जनरल सुलेमानी यांच्या अंत्यसंस्कारा वेळी हे बक्षीस जाहीर करण्यात आले. या वेळी सुलेमानी यांची मुलगी जिनाब हिने ट्रम्प हे मुर्खपणाचे प्रतीक आहेत. इराक-इराणच्या मैत्रीमुळे त्यांचा जळफळाट होत आहे, असे विधान केले.

2015 च्या अण्वस्त्र करारातून इराण बाहेर

जनरल कासिम सुलेमानी यांच्या हत्येमुळे खवळलेल्या इराणने 2015 च्या अण्वस्त्र करारातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या पुढाकाराने हा करार झाला होता. करारानुसार अणुइंधनाच्या समृद्धीकरणावर निर्बंध होते. त्या निर्बंधांचे पालन न करण्याची भूमिका इराणने घेतली आहे. या निर्णयामुळे जगाची चिंता वाढणार आहे.

इराकबरोबरची मैत्री विसरून कठोर निर्बंध लादू 

इराकने जर आमच्या सैन्यांना बाहेर काढण्यास सुरुवात केली तर आम्ही त्यांच्या सोबतची मैत्री विसरू आणि त्यांनी आधी कधी पाहिले नसतील असे भयंकर निर्बंध त्यांच्यावर लादू. बगदादमध्ये आमचा अत्यंत महागडा एअरबेस आहे. त्यावर आम्ही अब्ज डॉलरचा खर्च केला आहे. इराक या खर्चाची भरपाई जोपर्यंत देत नाही तोपर्यंत आम्ही येथून हटणार नाही, अशी धमकी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली आहे.