
सामना ऑनलाईन । टोकियो
गे असण्यावरचा इलाज म्हणून महिलांची चुंबनं घेतल्याचं स्पष्टीकरण एका राष्ट्रपतीने दिलं आहे. फिलीपाईन्सचे रोड्रिगो दुतेर्ते यांनी ही कबुली दिली असून एका सार्वजनक कार्यक्रमात पाच महिलांची चुंबनं घेतल्याने ते चर्चेत आले होते.
नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, दुतेर्ते जपान दौऱ्यावर आले होते आणि तिथे ते फिलीपाईन्स समुदायातील लोकांना भेटले. या भेटीसाठी एका सार्वजनिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. तिथे कार्यक्रम संपण्यावेळी दुतेर्ते यांनी उपस्थित असलेल्या महिला स्वयंसेवकांकडे चुंबनाची मागणी केली. ते एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी त्या महिलांचं चुंबनही घेतलं. या प्रसंगाचे फोटो व्हायरल झाल्यानंतर दुतेर्ते यांनी आपण समलैंगिक असून या चुंबनामुळे मला त्यापासून सुटका होण्यासाठी मदत मिळाल्याचा खुलासा केला आहे.
दुतेर्ते हे यापूर्वीही महिलांचं चुंबन घेतल्यामुळे चर्चेत आले होते. 2018च्या जून महिन्यात त्यांनी एका परदेशी विवाहित महिलेचं सार्वजनिक कार्यक्रमात चुंबन घेतलं होतं. या चुंबनानंतर दुतेर्ते यांच्याविरोधात वादाचं मोहोळंही उठलं होतं.




























































