फेडरर देणार टेनिस कारर्किर्दीला पूर्णविराम! सोशल मिडीयावरुन निवृत्तीची घोषणा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सदाबहार टेनिसपटू रॉजर फेडररने अखेर 24 वर्षांच्या देदीप्यमान कारकीर्दीला पूर्णविराम देण्याचा निर्णय घेतला. तब्बल 20 ग्रॅण्डस्लॅम किताबाचा मानकरी असलेल्या स्वित्झर्लंडच्या या महान टेनिसपटूने गुरुवारी सोशल मीडियावर पोस्ट टाकून निवृत्तीची घोषणा केली आहे. पुढील आठवडय़ात होणाऱया लेवर कप स्पर्धेनंतर आपण निवृत्त होत असल्याचे रॉजर फेडररने आपल्या पत्रामध्ये नमूद केले आहे.

रॉजर फेडररच्या निवृत्तीची ही बातमी वाऱयाच्या वेगाने पसरली. जगभरातील त्याच्या चाहत्यांना यामुळे मोठा धक्का बसला असून फेडररच्या पोस्टवर प्रतिक्रियांचा अक्षरशः महापूर आला आहे. सोशल मीडियावर टाकलेल्या पत्रामधून 41 वर्षीय रॉजर फेडररने आपल्या भावनांना वाट करून दिली. तो म्हणाला, ‘मी आता 41 वर्षांचा झालोय. गेल्या 24 वर्षांत मी जवळपास 1500 हून अधिक टेनिस सामने खेळलोय, मात्र या प्रदीर्घ कारकीर्दीमध्ये कुठे थांबायचे हे मला ठरवायला हवे,’ असे अनेक वर्षे ‘नंबर वन’च्या सिंहासनावर राहिलेल्या रॉजरने या पत्रात म्हटले आहे.

या पत्रामध्ये रॉजर फेडररने धर्मपत्नी मिर्काला हिलाही धन्यवाद दिले आहेत. ‘तिने माझ्या पहिल्या अंतिम सामन्याच्या आधी मला खूप प्रोत्साहन दिले होते. त्यावेळी ती आठ महिन्यांची गर्भवती होती. 20 वर्षांहून अधिक काळ ती माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली आहे,’ असेही त्याने आपल्या पत्रात नमूद केले आहे.

टेनिस खेळत राहीन, पण…

टेनिसने मला आयुष्यात भरभरून दिले. यात सर्वात मोलाची भेट म्हणजे या प्रवासात मला भेटलेल्या विलक्षण व्यक्ती, माझे मित्र, माझे प्रतिस्पर्धी खेळाडू आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मला आयुष्यभर पाठिंबा देणारे चाहते. टेनिसच्या निमित्ताने 40 देशांत खेळण्याची संधी मिळाली. या प्रवासात अनेकदा हसलो, कधी रडलो, कधी दुखापतीने त्रस्त झालो. मात्र या सर्व गोष्टी मी नेहमी सकारात्मकतेने घेतल्या. पुढील आठवडय़ात होणारी लेवर कप स्पर्धा ही माझ्या कारकीर्दीतील शेवटची एटीपी स्पर्धा असेल. यापुढेही मी टेनिस खेळत राहीन, पण ग्रॅण्डस्लॅममध्ये नाही,’ असेही रॉजर फेडररने आपल्या पत्रात स्पष्ट केले आहे.