बोपन्ना-युजुकीची अंतिम फेरीत धडक

हिंदुस्थानचा अनुभवी टेनिसपटू रोहन बोपन्ना आणि त्याचा जपानी जोडीदार ताकेरू युजुकी यांनी या हंगामातील सर्वात संस्मरणीय खेळ साकारत जपान ओपनच्या अंतिम फेरीत धडक मारली. सोमवारी झालेल्या उपांत्य फेरीत या जोडीने अमेरिकेच्या अव्वल मानांकित ख्रिश्चियन हॅरिसन-इव्हान किंग या जोडीला रोमहर्षक लढतीत पराभूत केले. बोपन्ना-युजुकी यांनी 4-6, 6-3, 18-16 असा थरारक विजय मिळवला. पहिला सेट गमावल्यानंतर या जोडीने दुसऱ्या सेटमध्ये दमदार पुनरागमन केले आणि नंतरच्या मॅरेथॉन सुपर टायब्रेकमध्ये अप्रतिम संयम राखत तिसऱ्या मॅच पॉइंटवर सामना जिंकला. 44 वर्षीय बोपन्नाने आपल्या प्रभावी सर्व्हिसचा पुरेपूर उपयोग केला, तर युजुकीने अचूक रिटर्न्स आणि नेटवरील खेळाने छाप पाडली. या विजयासह बोपन्नाने आणखी एका स्पर्धेच्या अंतिम फेरीत मजल मारली आहे.

यापूर्वी, 2025 हंगामात बोपन्नाची सर्वोत्तम कामगिरी क्वीन्स क्लब एटीपी 500 स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीपर्यंत पोहोचण्यात होती. जपान ओपनमध्ये मिळालेल्या या विजयामुळे बोपन्ना-युजुकी जोडीने नवा आत्मविश्वास मिळवला असून आता त्यांनी आपले लक्ष विजेतेपदावर केंद्रित केले आहे.