
सामना प्रतिनिधी । नवी दिल्ली
म्यानमारमधून हिंदुस्थानच्या सर्वदूर घुसलेल्या रोहिंग्या मुसलमानांना देशाबाहेर कोण काढणार, या प्रश्नावर केंद्र सरकारने आज नेहमीप्रमाणे गुळमुळीत उत्तर देत सुरुवातीला घुसखोरांची जबाबदारी राज्यांवर ढकलण्याचा प्रयत्न केला. मात्र लोकसभेत विरोधी पक्षांसह स्वपक्षीयांनीही धारेवर धरल्यामुळे राज्य सरकारकडून माहिती घेतल्यानंतर अवैधरीत्या राहणाऱया रोहिंग्यांना देशाबाहेर हाकलून देऊ. त्यासाठी विदेश मंत्रालयाशी चर्चा केली जाईल, असे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी लोकसभेत स्पष्ट केले.
लोकसभेत आज प्रश्नोत्तराचा अर्धा तास रोहिंग्याच्या मुद्दय़ावरून गाजला. रोहिंग्या मुस्लिम केवळ ईशान्य हिंदुस्थानातच नाही, तर जम्मू-कश्मीरपासून मुंबईपर्यंत सर्वच ठिकाणी पथाऱया पसरत आहेत. देशात अवैध राहण्याइतपतच या रोहिंग्यांचा उपद्रव नाही, तर देशविघातक दहशतवादी कारवायांमध्येही या रोहिंग्यांचा सहभाग आहे याकडे जम्मू-कश्मीरमधील भाजप खासदार जुगलकिशोर शर्मा यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. त्यावर उत्तर देताना केंद्रीय गृहराज्यमंत्री किरेन रिजीजू यांनी रोंहिग्या या देशात शरणार्थी म्हणून आलेले नाहीत, तर ते अवैधरीत्या देशात घुसले आहेत. देशविघातक कारवायांमध्येही त्यांचा सहभाग असल्याचे पुरावे हाती लागले आहेत. त्याचा तपशील आता जाहीर करता येणार नाही. मात्र जम्मू- कश्मीरसह तेलंगणा, हरयाणा, पंजाब आणि दिल्लीपर्यंत रोहिंगे घुसले असल्याचे रिजीजू यांनी कबूल केले.
किती रोहिंगे देशाबाहेर काढले याचे उत्तर रिजीजू देऊ शकले नाहीत. त्यामुळे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी लोकसभेत निवेदन केले. रोहिंग्यांना परत पाठविण्याचा अधिकार राज्य सरकारचा आहे. त्यामुळे रोहिंग्यांची नेमकी किती संख्या आहे आणि कितीजणांना परत पाठवले याची माहिती सध्या सांगता येणार नाही. रोहिंग्यांना परत पाठविण्यासाठी त्यांची जनगणना करण्याचे आदेश राज्य सरकारांना दिले आहेत. ही संख्या आल्यानंतर आम्ही परराष्ट्र मंत्रालयाशी बोलून अवैधरीत्या देशात ठाण मांडून बसलेल्या रोहिंग्यांना हाकलले जाईल, असे राजनाथ यांनी स्पष्ट केले. भाजपचे रामस्वरूप शर्मा, जुगलकिशोर शर्मा, शिवसेनेचे अरविंद सावंत व तृणमूल काँगेसचे सुगत बोस यांनी यासंदर्भात प्रश्न विचारला होता.
तुम्हाला बांगलादेशी घुसखोरांना वाचवायचे आहे काय?
अमित शहांच्या वक्तव्याने राज्यसभेत गदारोळ
१९८५ मध्ये राजीव गांधींनी आसाम करार केला होता. तो एनआरसीसारखाच होता किंबहुना एनआरसीचा रिपोर्ट म्हणजे आसाम कराराचा भाग आहे, मात्र हा रिपोर्ट सार्वजनिक करायची काँग्रेसची हिंमत नव्हती ती हिंमत आम्ही दाखवली आहे. तुम्हाला बांगलादेशी घुसखोरांना केवळ मतांसाठी वाचवायचे आहे का, असा सवाल करत भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी राज्यसभेत विरोधकांना सुनावले. दिवंगत पंतप्रधान राजीव गांधींनी आसाम करार केला होता. त्याचाच हा एक भाग आहे. सध्याच्या काँग्रेसला राजीव गांधींचा हा करारही मान्य नसावा, असा टोला शहा यांनी लगावला. शहा यांच्या वक्तव्यानंतर सभागृहात काँग्रेससह विरोधकांनी जोरदार संतप्त घोषणाबाजी केली. या गदारोळामुळे सभागृहाचे कामकाज ठप्प झाले.



























































