रोहित करतोय नॉन स्टॉप ट्रेनिंग, आयपीएल, ऑस्ट्रेलियन दौऱयासाठी फिट होणार

हिंदुस्थानच्या सीनियर राष्ट्रीय निवड समितीने सोमवारी ऑस्ट्रेलियन दौऱयासाठी हिंदुस्थानी संघाची घोषणा केली. यामधून रोहित शर्मा व इशांत शर्मा यांना दुखापतीचे कारण पुढे करीत बाहेर काढण्यात आले.

रोहित शर्मा व इशांत शर्माला दुखापत झालीय म्हणून वेटिंगवर ठेवण्यात आले, पण मयांक अग्रवाल व नवदीप सैनीला मात्र संघामध्ये ठेवण्यात आले. निवड समितीच्या या निर्णयावर चोहोबाजूंनी टीका करण्यात आली. आता या सर्व प्रकरणाला मागे टाकत मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा नॉन स्टॉप ट्रेनिंग करतोय. त्याला आयपीएलमधील उर्वरीत लढतींमध्ये तसेच आगामी ऑस्ट्रेलियन दौऱयामध्ये खेळावयाचे आहे. त्यामुळे तो कसून सराव करीत आहे.

एका सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार समजले की, रोहित शर्मा दररोज ट्रेनिंग करीत आहे. मुंबई इंडियन्सचा संघ जेव्हा सरावासाठी मैदानात उतरतो तेव्हा रोहित शर्माही सराव करतो. मागील लढतीआधी त्याने क्षेत्ररक्षणाचा, थ्रोचा सराव केला. आता तो नेटमध्ये फलंदाजीचा सरावही करीत आहे. पायाला झालेल्या दुखापतीमधून तो बाहेर येण्याचा प्रयत्न करीत आहे.

फिजिओ नितीन पटेल यांच्या रिपोर्टनुसार बाहेर काढले

राष्ट्रीय निवड समितीने रोहित शर्मा व इशांत शर्मा यांना दुखापतीमुळे ऑस्ट्रेलियन दौऱयासाठी हिंदुस्थानी संघात स्थान दिले नाही. त्यांना वेटिंगवर ठेवण्यात आले. पण निवड समितीने हा निर्णय घेण्यामागे एक कारण होते. ते एका दैनिकामधून प्रसिद्ध करण्यात आले आहे. फिजिओ नितीन पटेल यांनी खेळाडूंच्या दुखापतीबाबत एक रिपोर्ट सादर केला होता. त्यामध्ये रोहित शर्मा निवडीसाठी फिट नसल्याचे स्पष्टपणे अधोरेखित करण्यात आले होते. त्यामुळे निवड समितीने त्याला बाहेरच ठेवले. मात्र यावेळी असा प्रश्न उभा राहतो की, नवदीप सैनी व मयांक अग्रवाल यांनाही दुखापत झालीय. तरीही रिपोर्टमध्ये त्यांना संघाबाहेर ठेवण्याचा उल्लेख करण्यात आला नाही. हे समजण्यापलीकडे आहे.

आपली प्रतिक्रिया द्या