
बारामती जिल्हा परिषद निवडणुकीसाठी पिंपळी येथे मतदानाचा हक्क बजावल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते, आमदार रोहित पवार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केले. अजितदादांच्या निधनानंतर निर्माण झालेली पोकळी कोणीही भरून काढू शकत नाही, मात्र एक कुटुंब म्हणून मी सुनेत्रा काकींमध्येच अजितदादांना पाहतो, अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली. अजितदादांकडील उपमुख्यमंत्रीपद आणि सर्व महत्त्वाची खाती सुनेत्राकाकींना मिळावीत, ही आमची इच्छा होती, पण आता त्यांनी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची धुराही सांभाळावी, असे मतही रोहित पवार यांनी व्यक्त केले.
रोहित पवार म्हणाले की, आज बारामती तालुक्यामध्ये पिंपळी गावात ज्यादिवसापासून मला मतदानाचा अधिकार मिळाला त्या दिवसापासून आतापर्यंत मी येऊन मतदान केले आहे. इथे आल्यानंतर सर्व राजकीय आठवणी डोळ्यासमोर आल्या. गेल्या काही महिन्यांमध्ये अजितदादांसोबत झालेली चर्चा परत ऐकायला येत आहे. अजितदादांचे जे स्वप्न होतं, या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये दादांचे जे कार्यकर्ते आहेत ते जास्तीत जास्त निवडून यावेत, ही त्यावेळीची त्यांची इच्छा आणि आज आपल्याला ते त्यांचे अंतिम स्वप्न होते म्हणावे लागले. आज पिंपळीला माझ्या परिवारासह इथे येऊन मी मतदानाचा हक्क बजावला आहे. दादांचे जे स्वप्न होते की, जिल्हा परिषदेला त्यांचे कार्यकर्ते जास्त निवडून येतील ते स्वप्न मतदार आणि कार्येकर्ते पूर्ण करतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
पवार कुटुंबाने नेहमीच एकत्र राहावे, अशी दादांची मनापासून इच्छा होती आणि त्यानुसारच आज काटेवाडीत कुटुंबातील सदस्य एकत्र येऊन मतदान करत असल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या तेरा दिवसांपासून पवार कुटुंब एकसंध असून, काल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी जय पवार आणि कुटुंबातील इतर सदस्यांना मार्गदर्शन केल्याचेही त्यांनी म्हटले.
अजितदादांची मनापासूनची इच्छा होती की, पवार कुटुंबातील सर्वजण परिवार म्हणून एकत्र आले पाहिजेत. त्यासाठी दादांकडून प्रयत्न केला जात होता. सुप्रिया ताई, पवार साहेब आम्हीही असाच प्रयत्न करत होतो. दु:खद घटना घडल्यावर 13 दिवस आम्ही परिवार म्हणून एकत्र आहोत. अजितदादांचं स्वप्नं होतं की, परिवार म्हणून आपण एकत्रित राहिलं पाहिजे. त्यानुसार कुठेही न ठरवत आज काटेवाडीत श्रीनिवास पवार, पार्थ पवार, सुनेत्रा पवार एकत्र मतदानला पोहोचले, असे रोहित पवार यांनी म्हटले.
शरद पवार, पार्थ पवार आणि रोहित यांचा एक फोटो व्हायरल होत आहे, त्यावर बोलताना रोहित पवार यांनी म्हटले की, काल पवार साहेबांनी जय पवार आणि आम्हा सगळ्यांना मार्गदर्शन केले. ते मार्गदर्शन भावनिक स्वरुपाचे होते. काही गोष्टी आपल्याला येणाऱ्या काळात कराव्या लागतील, दादांच्या स्मरणार्थ काही गोष्टी करायच्या आहेत, त्याबाबत काल संध्याकाळी चर्चा झाली. एखादी गोष्ट पवार साहेबांच्या मनात आली की, ते बोलावून घेतात आणि मार्गदर्शन करतात, असेही रोहित पवार यांनी सांगितले.
यावेळी रोहित पवार यांनी राजकीय घडामोडींवरही भाष्य केले. सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. यावर रोहित पवार यांनी बोलणे टाळले. मी फक्त 10 फेब्रुवारीला अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत असणाऱ्या काही शंका उपस्थित करणार आहे. तर 12 तारखेला मी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाबाबत काय ठरलं होतं, हे सांगणार आहे. आम्ही विलीनीकरण का करणार होतो, दादांच्या आणि आमच्या मनात नेमकं काय होतं, हे मी सांगणार आहे, असे रोहित पवार यांनी म्हटले. अजित पवार यांच्या निधनाच्या धक्क्यामुळे आम्हाला कोणालाही काही सूचत नव्हते. त्यामुळे आमच्या मनात कोणतेही राजकीय विचार आले नव्हते. आता या धक्क्यातून बाहेर पडून आम्ही राजकीय विचार करायला सुरुवात करु. पवार कुटुंबीयांमध्ये आतापर्यंत कोणतीही राजकीय चर्चा झालेली नाही. 9 तारखेनंतर या सगळ्याला सुरुवात होईल, असे रोहित पवार यांनी सांगितले.































































