अजितदादांना न्याय द्या! बारामतीत उमेदवार देऊन काँग्रेसचा संदेश, हर्षवर्धन सपकाळांच्या भेटीनंतर रोहित पवारांचे विधान, अर्ज मागे घेण्याची विनंती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे. ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी दोन्ही राष्ट्रवादीकडून प्रयत्न सुरू आहेत. बुधवारी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याशी फोनवरून चर्चा केल्याचे समोर आले होते. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनीही सपकाळ यांची भेट घेत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची विनंती केली.

रोहित पवार यांनी नाना चौकातील सर्वोदय आश्रमात जाऊन सपकाळ यांची भेट घेतली. हर्षवर्धन सपकाळ यांच्या भेटीनंतर बोलताना रोहित पवार म्हणाले की, बारामती विधानसभा निवडणुकी संदर्भात आमच्यात चर्चा झाली. याआधी सुप्रिया सुळे आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्यातही चर्चा झाली. तसेच काँग्रेसच्या हायकमांडशीही संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहेत. या भेटीदरम्यान सपकाळ यांनी काँग्रेसची स्पष्ट भूमिका सांगितली. एवढा मोठा नेता गेल्यानंतर त्या नेत्यासाठी महाराष्ट्रात एफआयआर दाखल होत नसेल आणि तपासाला गती मिळत नसेल तर या महाराष्ट्रात शासन आणि प्रशासन सामान्य लोकांना कसा न्याय देणार असे काँग्रेसचे स्पष्ट मत आहे.

काँग्रेस पक्ष वेगळा असून त्यांचे विचार आणि धोरणं पक्की आहेत. अजितदादांना न्याय द्या हा फार महत्त्वाचा संदेश त्यांनी उमेदवारी देऊन दिला आहे. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असून कुटुंबातील सदस्य आणि दादांचा कार्यकर्ता म्हणून माघार घेण्यासाठी मी त्यांना विनंती केली आहे. काँग्रेसमध्येही काही प्रमाणात यावर चर्चा सुरू आहे, असे रोहित पवार म्हणाले.

काँग्रेस उमेदवारी अर्ज मागे घेणार का? असे विचारले असता रोहित पवार म्हणाले की, प्रदेशाध्यक्षांना अधिकार असतात, पण त्यांना केंद्रातील नेत्यांशीही बोलावे लागेल. आमचाही संवाद झालेला असून दुपारपर्यंत वेळ आहे, योग्य निर्णय घेतला जाईल. तसेच बारामतीमधून उभे राहिलेल्यांपैकी बरेचसे उमेदवार माघार घेतील. काही लोकांना निवडणूक लागली की फॉर्म भरण्याची सवय असते. पण बारामतीची लोक हुशार असून ते योग्य निर्णय घेतील, असेही रोहित पवार म्हणाले.

पार्थ पवारांच्या विधानावर नाराजी

काँग्रेसचा डाऊनफॉल सुरू झाल्याचे विधान पार्थ पवार यांनी केले होते. त्यामुळे काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी होती. पार्थचे विधान चुकीचे होते. दादांकडे बघून मी पार्थ आणि पवार कुटुंबाच्या वतीने दिलगिरी व्यक्त करतो, असेही सपकाळ यांना म्हणालो आणि अर्ज माघारी घेण्याची विनंती केली, असेही रोहित पवार यावेळी म्हणाले. ते ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलत होते.