रोहित पवार यांचे भरपावसात उपोषण 

कर्जतजामखेड मतदारसंघात एमआयडीसीच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी आज विधिमंडळातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळय़ाजवळ भरपावसात उपोषण आंदोलन केले. अधिवेशन संपण्याअगोदर एमआयडीसीबाबत अधिसूचना काढण्याचे आश्वासन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिल्यानंतर रोहित पवार यांनी आंदोलन मागे घेतले. मात्र आश्वासनाप्रमाणे कार्यवाही केली नाही तर मी एकटा नव्हे, तर माझ्या मतदारसंघातील हजारो युवक मुंबईत येऊन आमरण उपोषण करतील, असा इशाराही रोहित पवार यांनी दिला. रोहित पवार हे गेल्या दोन वर्षांपासून एमआयडीसीसाठी पाठपुरावा करीत होते. परवानगीही मिळाली. उद्योगमंत्री उदय सामंत, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी एमआयडीसीबाबत अधिसूचना काढण्याबाबत यापूर्वीच्या दोन अधिवेशनात आश्वासनही दिले होते.