
मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्राला पावसाने अक्षरश: झोडपून काढले आहे. गेल्या काही दिवसांपासून सतत कोसळणाऱ्या पावसामुळे अनेक भागांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतीचे मोठे नुकसान झाले असून जनावरे वाहून गेली आहेत. राहत्या घरांमध्ये पाणी शिरल्याने संसारोपयोगी साहित्याचेही नुकसान झाले आहे. जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यावर अस्मानी संकट कोसळलेले असताना सरकार मात्र तुटपुंजी मदत देत असल्याचे समोर आले आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी महायुती सरकारवर हल्ला चढवला.
रोहित पवार यांनी बुधवारी सकाळी एक्स अकाऊंटवर एक पोस्ट केली आहे. यात ते म्हणतात, मुख्यमंत्र्यांनी २२०० कोटीची मदत केली असल्याचं सांगितलं, परंतु मदत कोणत्या दराने दिली हे देखील मुख्यमंत्र्यांनी सांगायला हवं. ३१.५ लाख शेतकऱ्यांना २२१५ कोटी म्हणजे एका शेतकऱ्याला सरासरी ७००० रुपये दिले आहेत. शेतकऱ्यांना देण्यात येणारी मदत ८५०० प्रती हेक्टर म्हणजेच ३४०० रुपये एकरी याप्रमाणे देण्यात आली.
एकरी ३४०० रुपयात काय होणार आहे? तुमच्या सरकारी घरातील बेडरूमची गादी आणि सोफा २० लाखाचा आणि आमच्या उध्वस्त झालेल्या शेतकऱ्याला एकरी ३४०० रु. मदत… एवढ्या अलिशान सरकारला एवढी तुटपुंजी मदत शोभते का? असा सवाल रोहित पवार यांनी केला.
मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, कृषिमंत्री आणि इतर सर्व मंत्री हेक्टरी ५० हजार रु. मदत देणार की नाही, यावर बोलायला तयार नाहीत. आज या ओल्या दुष्काळात कोरड्या घोषणा आणि खोटी आश्वासने नको तर सरकारने ओला दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ५० हजार रु. मदत द्यावी, अशी मागणी रोहित पवार यांनी केली.
मुख्यमंत्र्यांनी २२०० कोटीची मदत केली असल्याचं सांगितलं, परंतु मदत कोणत्या दराने दिली हे देखील मुख्यमंत्र्यांनी सांगायला हवं.
३१.५ लाख शेतकऱ्यांना २२१५ कोटी म्हणजे एका शेतकऱ्याला सरासरी ७००० रु दिले आहेत. शेतकऱ्यांना देण्यात येणारी मदत ८५०० प्रती हेक्टर म्हणजेच ३४०० रु. एकरी… pic.twitter.com/NZWv19pu76
— Rohit Pawar (@RRPSpeaks) September 24, 2025
शेतकऱ्यांना मदत करतानाच तिजोरीत खडखडाट आठवतो का?
महायुती सरकारचा कारभार म्हणजे गरज काय असते आणि सरकार देते तुटपुंजी मदत, शेतकऱ्यांना मदत करतानाच तिजोरीत खडखडाट आठवतो का? केंद्राकडे प्रस्ताव पाठवा, जास्तीचा निधी घेऊन या आणि मदत करा. मदतीच्या नावाखाली शेतकऱ्यांना एखादा तुकडा फेकून, अपमान करू नका. नको असलेल्या शक्तिपीठसाठी स्वतःच्या जाहिरातीसाठी, या सरकारकडे पैसे आहेत पण शेतकरी अडचणीत आला की मात्र नियम, निकष दिसतात. आज मराठवाड्यातील शेतकरी संपून गेला आहे, हातातील पीक तर गेलं, पण जमीन पण खरवडून निघाली आहे. म्हणजे पुन्हा काही करायला हातात काहीही उरले नाही, एकीकडे पीकविमा कंपन्यांनी स्वतःची चांदी केली पण शेतकऱ्यांची माती झाली आहे. या सरकारने कर्जमाफी न करून शेतकऱ्यांना अर्धमेल केलंच होतं, या पावसात शेतकरी संपला. मदत करताना पण हा लाडका मंत्री, आमदार त्याच्या तालुक्याला जास्त मदत, इतराना कमी मदत हे ही करू नका. सर्व शेतकऱ्यांना निकषांपलिकडे जाऊन मदत द्या, म्हणूनच आम्ही मागणी करतोय, राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा आणि निकषांपलिकडे जाऊन मदत करा, अशी मागणी काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी केली.
नुकसान मणभर, मदत कणभर! सरकारकडून पूरग्रस्तांची थट्टा छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणीला कवडीही नाही