
राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. एकिकडे राज्यात वातावरण गंभीर असताना दुसरीकडे उपमुख्यंत्री आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस मात्र छत्तीसगढ विधानसभा निवडणुकीसाठी रायपूरच्या दौऱ्यावर होते. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी टीका केली आहे.
एक्स या समाज माध्यमावरील आपल्या अधिकृत हँडलवरून रोहित पवार यांनी ही टीका केली आहे. आज सामाजिकदृष्ट्या महाराष्ट्र होरपळतोय पण ही आग विझवण्याचं सोडून आपले गृहमंत्री छत्तीसगड भाजप राजकीय आगीत खाक होऊ नये, याची काळजी घेण्यासाठी महाराष्ट्र वाऱ्यावर सोडून तिकडे जाताहेत. कधी कोणत्या गोष्टीला प्राधान्य द्यायचं, हे देवेंद्र फडणवीस, आपल्यासारख्या नेत्याला नक्कीच कळत असणार… तरीही महाराष्ट्र जळताना तो शांत करण्याऐवजी तुम्ही इतर राज्यात जाऊच कसं शकता, असा प्रश्न रोहित पवार यांनी विचारला आहे.
आज सामाजिकदृष्ट्या महाराष्ट्र होरपळतोय… पण ही आग विझवण्याचं सोडून आपले गृहमंत्री छत्तीसगड भाजप राजकीय आगीत खाक होऊ नये, याची काळजी घेण्यासाठी महाराष्ट्र वाऱ्यावर सोडून तिकडं जातात…
कधी कोणत्या गोष्टीला प्राधान्य द्यायचं, हे देवेंद्र फडणवीस साहेब आपल्यासारख्या नेत्याला… pic.twitter.com/m6QM1O3ugE
— Rohit Pawar (@RRPSpeaks) October 31, 2023
एकिकडे मनोज जरांगे पाटील शांततेचं आवाहन करत आहेत. पण, गृहमंत्री असूनही महाराष्ट्र जळत असताना तुम्ही इतर राज्यात निघून जाता. याचा अर्थ या जाळपोळीच्या घटनांची तुम्ही अप्रत्यक्षपणे पाठराखण करता, असं आम्ही समजायचं का? असा थेट प्रश्नही रोहित पवार यांनी एक्सच्या माध्यमातून फडणवीस यांना विचारला आहे.





























































