कृषिमंत्र्यांचा व्हिडीओ काढणाऱयाला पकडण्यासाठी चित्त्याच्या वेगाने चौकशी- रोहित पवार

पतीच्या खुन्यांना गजाआड करण्यासाठी ज्ञानेश्वरी मुंडे ही भगिनी दोन वर्षे आक्रोश करतेय तरी तिची दखल घेतली जात नाही. हायकोर्टाने सांगूनही सोमनाथ सूर्यवंशी यांच्या खुन्यांवर गुन्हा दाखल होत नाही. संतोष देशमुख प्रकरणातही दिरंगाई झाली, पण विधिमंडळात पत्ते खेळणाऱ्या मंत्र्याचा व्हिडीओ कुणी काढला याची मात्र सरकार चित्त्याच्या वेगाने चौकशी करतेय, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस आमदार रोहित पवार यांनी आज महायुती सरकारला लगावला.

रोहित पवार यांनी ‘एक्स’वर यासंदर्भात पोस्ट केली आहे. रमी खेळणाऱया मंत्र्याचे पितळ उघड करणारा विधिमंडळ सभागृहात बसलेला असो की गॅलरीत हे महत्त्वाचे नाही, तर त्याने मंत्र्याचा कारनामा जगापुढे आणला हे महत्त्वाचे आहे, असे त्यांनी त्यात म्हटले आहे. उद्या व्हिडीओ काढणारी व्यक्ती पुढे आली तर राज्यातील चार कोटी शेतकऱयांसह महाराष्ट्र त्याचा सत्कारच करेल, असेही त्यांनी नमूद केले आहे.

शेतकरीविरोधी सरकारला कायम उघडे पाडू

विरोधी पक्षाने आवाज उङ्गवल्यानंतर सरकार विधिमंडळात चौकशीची घोषणा करते, पण त्याचे पुढे काहीच होत नाही. सामान्य माणसांच्या ज्वलंत विषयांकडे दुर्लक्ष केले जाते, पण राजकीय हिशेब चुकता करण्यासाठी मात्र पदाचा कशा पद्धतीने गैरवापर होतो, याचे उत्तम उदाहरण म्हणजे ही चौकशी आहे, अशी टीका रोहित पवार यांनी केली आहे.