
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहीत पवार यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. निवडणूका तोंडावर आलेल्या असतानाही सरकारकडून अद्याप समित्यांची स्थापना होत नसल्याने रोहीत पवार संतापले असून त्यांनी ट्विटरवरून राज्य सरकारला फटकारले.
”या सरकारचा सर्व कारभार हा सोईस्कर पद्धतीने सुरु आहे. केवळ खासदार संजय राऊत साहेब यांच्यावर कारवाई करता यावी, या हेतूने घाईघाईत विशेषाधिकार समितीची स्थापन केली. (नंतर त्यांचा हा मनसुबा काही पूर्ण झाला नाही, हा भाग वेगळा) परंतु लोकलेखा समितीसह इतर सर्वच महत्त्वाच्या समित्यांच्या स्थापनेबाबत मात्र हे सरकार उदासीन आहे. विरोधी पक्ष आणि नेते फोडण्यासाठी या समित्यांचा उपयोग झाला असता तर मला खात्री आहे की, सरकार स्थापनेच्या दुसऱ्याच दिवशी या समित्यांचीही स्थापना झाली असती. आता निवडणुका तोंडावर येऊनही समित्यांची स्थापना होत नाही, यावरुन सरकार राज्याच्या हितासाठी किती ‘गंभीर’ आहे, हे स्पष्ट होतं”, असे ट्विट रोहीत पवार यांनी केले आहे.
भरपावसात केलेले उपोषण
कर्जत-जामखेड मतदारसंघात एमआयडीसीच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी आज विधिमंडळातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळय़ाजवळ भरपावसात उपोषण आंदोलन केले. अधिवेशन संपण्याअगोदर एमआयडीसीबाबत अधिसूचना काढण्याचे आश्वासन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिल्यानंतर रोहित पवार यांनी आंदोलन मागे घेतले. मात्र आश्वासनाप्रमाणे कार्यवाही केली नाही तर मी एकटा नव्हे, तर माझ्या मतदारसंघातील हजारो युवक मुंबईत येऊन आमरण उपोषण करतील, असा इशाराही रोहित पवार यांनी दिला.































































