त्यांनी जिभेला लगाम लावण्याची गरज आहे, अन्यथा…! रोहित पवार यांचा शिवतारे यांना इशारा

Rohit Pawar Slams Vijay Shivtare Over Criticism of Sharad and Ajit Pawar

पुरंदरचे माजी मंत्री विजय शिवतारे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर केलेल्या टीकेला आमदार रोहित पवार यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. ‘टीका करताना शिवतारे साहेब यांनी जिभेला लगाम लावण्याची गरज आहे, अन्यथा पोपटासारखं ‘मिठू.. मिठू’ बोलणाऱ्यांचं काय होतं, याचा अनुभव त्यांच्या पाठीशी आहेच’, अशा शब्दांत रोहित पवारांनी त्यांचा समाचार घेतला.

रोहित पवार यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून शिवतारेंच्या राजकीय कारकिर्दीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले की, तीन वेळा आमदार आणि पाच वर्षे मंत्री राहूनही ज्यांना आपल्या मतदारसंघाचा विकास करता आला नाही, त्यांनी पवारांसारख्या दिग्गज नेत्यांवर टीका करण्यापूर्वी आपली पात्रता तपासावी. शिवतारे यांची ही टीका म्हणजे त्यांच्या स्वतःच्याच नाकर्तेपणाची कबुली असल्याची टीकाही त्यांनी केली.

जेजुरी गडाच्या निधीवरून आठवण

अजित पवारांनीच श्रीक्षेत्र जेजुरी गडासाठी ३५० कोटी रुपयांच्या विकास आराखड्यास मंजुरी देऊन निधी उपलब्ध करून दिला, याचा विसर शिवतारेंना पडला असावा, असेही रोहित पवार यांनी नमूद केले. ज्या पक्षाने त्यांना आमदारकी आणि मंत्रिपद दिले, त्या पक्षाशीच त्यांनी प्रतारणा केल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.

‘मिठू मिठू’ बोलणाऱ्यांना इशारा

रोहित पवार यांनी आपल्या पोस्टमध्ये शिवतारेंना त्यांच्या जुन्या विधानांची आणि निकालांची आठवण करून दिली. ‘शिवतारे साहेब यांनी जिभेला लगाम लावण्याची गरज आहे, अन्यथा पोपटासारखं ‘मिठू.. मिठू’ बोलणाऱ्यांचं काय होतं, याचा अनुभव त्यांच्या पाठीशी आहेच’, असंही ते म्हणाले.

त्यांच्याकडून काय अपेक्षा करणार! रोहित पवारांचा टोला

आपल्या पोस्टमध्ये त्यांनी शिवतरे यांना सणसणीत टोला देखील लगावला. ‘ज्या पक्षाने आमदारकी दिली, मंत्रीपद दिलं त्याच पक्षाला त्यांनी फसवलं.. त्यांच्याकडून काय अपेक्षा करणार!’, अशा शब्दात त्यांनी सुनावलं.