
रोहित शर्माच्या फिटनेसबाबत क्रिकेट क्षेत्रातील दिग्गजांसह क्रिकेटप्रेमींच्याही मनात साशंकता आहे. मात्र तो 2027 पर्यंत आपला फिटनेस राखू शकतो. म्हणजेच हिंदुस्थानचा वन डे कर्णधार रोहित शर्मा अजून किमान पाच वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळू शकतो, अशी रोहितचे मनोधैर्य उंचावणारी भावना माजी अष्टपैलू आणि युवराज सिंह यांचे वडील योगराज सिंह यांनी व्यक्त केली आहे.
रोहितने याआधीच टी-20 आणि कसोटी क्रिकेटला निरोप दिला असला तरी तो वन डे आणि आयपीएलमध्ये सक्रिय आहे. त्यामुळे तो 2027 विश्वचषकापर्यंत खेळेल का, याबाबत सारेच क्रिकेट विश्लेषक झाल्यासारखे रोहितबाबत आपले मत व्यक्त करू लागले आहेत.
रोहित शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना हिंदुस्थानसाठी चॅम्पियन्स ट्रॉफीत खेळला होता. त्यावेळी त्याच्या नेतृत्वाखाली हिंदुस्थानने विजेतेपद पटकावले. अंतिम सामन्यात रोहितने न्यूझीलंडविरुद्ध 76 धावांची खेळी केली होती आणि ‘सामनावीर’ ठरला होता. मात्र त्याच्या फिटनेसवर सतत प्रश्नचिन्ह उपस्थित होत असल्यामुळे त्याच्या भवितव्याबाबत क्रिकेट तज्ञांमध्ये प्रचंड मतभेद आहेत.
रोहितचा क्लास वेगळाच
रोहितबद्दल अनेक जण अनाठायी बोलतात. पण त्याची फलंदाजी पाहिली तर लक्षात येते की त्याचा दर्जा इतरांपेक्षा कितीतरी वरचा आहे. रोहितसारखा क्लास जगात क्वचितच आढळतो. त्यामुळे त्याला सांगायला हवे, देशाला अजून किमान पाच वर्षे तुझी गरज आहे. फिटनेसवर लक्ष दे, रोज सकाळी 10 किमी धाव आणि पाहिजे तर चार ट्रेनर ठेव. जर तो या इच्छाशक्तीने खेळला तर 45 व्या वर्षापर्यंत तो सहज क्रिकेट खेळू शकतो.
एवढेच नव्हे तर रोहितने स्वतःला तंदुरुस्त ठेवण्यासाठी देशांतर्गत क्रिकेट खेळावे. कुणीही रोहितच्या क्लासबद्दल बोलू नये. रोहितला अजून देशासाठी खूप काही देता येईल, असेही योगराज म्हणाले.