रोहितला कसोटी संघातून का वगळता?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

रोहित शर्माच्या नेतृत्वात हिंदुस्थानी क्रिकेट संघाने आशिया कप जिंकण्याची करामत करून दाखवली. इंग्लंडमधील अपयशानंतर टीम इंडियाने मिळवलेल्या घवघवीत यशानंतर चोहोबाजूंनी कौतुकांचा वर्षाव झाला, मात्र याचवेळी सौरभ गांगुली व हरभजन सिंग यांनी निवड समिती तसेच संघ व्यवस्थापनावर टीका करताना म्हटले की, रोहित शर्मासारख्या प्रतिभावान खेळाडूला कसोटी संघातून का वगळले जाते? झटपट क्रिकेटप्रमाणे कसोटीतही त्याचे स्थान कायम असायला हवे, असेही ते म्हणाले.

आशिया कपमध्ये मिळालेल्या यशानंतर तरी रोहित शर्मासाठी हिंदुस्थानी कसोटी संघाचे दरवाजे उघडे होतील असा विश्वास क्रिकेटप्रेमींपासून क्रिकेटतज्ञांना होता पण वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेतही त्याला बाहेरचाच रस्ता दाखवण्यात आला आहे. त्यामुळे संतापलेल्या हरभजन सिंगने आपले मत व्यक्त केले ते असे ः निवड समिती सदस्य नेमका काय विचार करताहेत? कोणाला समजले तर मलाही सांगा. दरम्यान, सौरभ गांगुली म्हणालाय, आशिया कपमध्ये केलेल्या जबरदस्त नेतृत्वासाठी रोहित तुझे अभिनंदन, मात्र कसोटी संघात तुला स्थान मिळत नाही हे पाहून नेहमीच आश्चर्य वाटते.

करुण नायरसोबत सविस्तर चर्चा – एमएसके प्रसाद

वेस्ट इंडीजविरुद्धच्या आगामी मालिकेसाठी टीम इंडियाची निवड करण्यात आल्यानंतर मी करुण नायरशी बोललो. यामध्ये पुनरागमन कसे करावे याबाबत स्पष्टपणे सांगितले असे राष्ट्रीय निवड समितीचे एमएसके प्रसाद यांनी यावेळी नमूद केले. इंग्लंडमधील कसोटी मालिकेत खेळण्याची संधी न मिळाल्यामुळे करुण नायर निराश झाला होता. यावर पुढे एमएसके प्रसाद म्हणाले, आता करुण नायरने स्थानिक स्पर्धा व ंिहंदुस्थान ‘अ’ संघामधून सातत्याने चमक दाखवायला हवी. भविष्यात तो कसोटी संघाचा सदस्य नक्कीच असेल असा विश्वासही त्यांनी पुढे व्यक्त केला.