रोहयोच्या 3 हजार 736 कोटींच्या समृद्धी आराखडय़ाला मान्यता, नगर जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत मंजुरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘महात्मा गांधी रोजगार हमी योजने’च्या 2022-23 या आर्थिक वर्षातील समृद्धी आराखडय़ाला जिल्हा परिषदेच्या मागील आठवडय़ात झालेल्या सर्वसाधारण सभेने मान्यता दिली आहे. या योजनेत यंदा विक्रमी 3 लाख 30 हजार 933 कामांना मंजुरी देण्यात आली असून, त्यासाठी 3 हजार 736 कोटी 86 लाख 8 हजार रुपये खर्चाचा अंदाज आहे.

नगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली रोहयो विभागाच्या उपजिल्हा कार्यक्रम समन्वयक रेश्मा होजगे यांनी हा आराखडा तयार केला आहे. यासह यंदाच्या रोहयोच्या आराखडय़ात जनावरांसाठी गोठे बांधणे, गावाच्या मागणीनुसार त्या ठिकाणी सार्वजनिक जागेवर गोदाम बांधणे, शाळा अंगणवाडय़ांना सरंक्षक भिंतीसह इमारती बांधण्यात येणार आहेत. यात 3 लाख 30 हजार 933 कामांचा समावेश करण्यात आला असून, त्यासाठी सुमारे 3 हजार 736 कोटी रुपयांचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे.

2022-23 साठी रोजगार हमीवरील प्रस्तावित कामांचा आराखडा जिल्हा परिषदेच्या रोहयो विभागाकडून तयार केला आहे. त्यात ‘अ’ वर्गात जलसंधारणविषयक सिमेंट नाला बांध, दगडी नाला बांध, गॅबियन बंधारे, शोषखड्डे, सार्वजनिक शोषखड्डे, सलग समतल चर, पाझर तलाव दुरुस्ती, जमीन सपाटीकरण, गाळ काढणे, वनीकरण, रस्तादुतर्फा वृक्षारोपण, रोपवाटिका अशी एकूण 59 हजार 951 कामे असून, त्यासाठीचे 478 कोटींचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे. याशिवाय ‘ब’ वर्गात सिंचन विहीर, सार्वजनिक विहीर, शेततळे, फळबाग लागवड, रेशीम उत्पादन, बांधावरील वृक्ष, घरकुल, सामूहिक गोठे, मत्स्यपालन अशी 2 लाख 24 कामे प्रस्तावित असून, त्याचे अंदाजपत्रक 2236 कोटींचे आहे. व्हर्मी कंपोस्ट, अझोला उत्पादन यासाठीची 24 हजार 896 कामे असून, त्यासाठी 60 कोटींचे अंदाजपत्रक आहे.

‘क’ वर्गात शौचालय, रस्ता खडीकरण, मुरमीकरण, सिमेंट रस्ता, डांबर रस्ता, ग्रामसंघ इमारत, बाजार ओटा, स्मशानभूमी शेड, सार्वजनिक ठिकाणी सुशोभीकरण आदी कामेही प्रस्तावित आहेत. यंदाच्या आराखडय़ात ‘ड’ वर्गात नावीन्यपूर्ण योजनेत आरसीसी मुख्य निवारा प्रणाली, रस्ता मुरमीकरण, पेव्हिंगब्लॉक रस्ता, ग्राम संघ इमारत, बचत गटांसाठी इमारत, सार्वजनिक जागेवरील गोदाम, शाळा, अंगणवाडीकडे जाणारा रस्ता, खेळाचे मैदान, शालेय स्वयंपाकगृह, शालेय संरक्षक भिंत, अंगणवाडी बांधकाम आदी कामे
प्रस्तावित आहेत.

1088 ठिकाणी शाळा, अंगणवाडय़ांना इमारती मिळणार

जिल्ह्यात रोहयोतून 775 शाळांवर रेन वॉटर हार्वेस्टिंग यंत्रणा, 260 अंगणवाडी बांधकामे, 87 हजार 600 जनावरांचे गोठे, 93 हजार शेळीपालनासाठी शेड, 17 हजार कुक्कुटपालन शेड, 114 सार्वजनिक गोदाम, 278 ठिकाणी खेळांचे मैदान, 29 शाळा आणि अंगणवाडय़ांना रस्ते, नव्याने चालू वर्षात 1 हजार 88 ठिकाणी शाळा अंगणवाडय़ांना इमारती बांधण्यात येणार आहेत.

पाहिजे ते काम, लागेल तेवढे काम

जिल्ह्यात 7 कोटी 72 लाखांहून अधिक मनुष्यदिन निर्माण करण्याचे उद्दिष्ट आहे. राज्य शासनातर्फे ‘लखपती कुटुंब’ या संकल्पनेवर आधारित रोहयोचे हे लेबर बजेटचे रूपांतर ‘समृद्धी बजेट’मध्ये करण्यात आले आहे. या धोरणांतर्गत आता रोजगार हमीवर पाहिजे ते काम, लागेल तेवढे काम, तसेच, वैयक्तिक लाभाच्या एकापेक्षा जास्त योजनांचा लाभ देऊन प्रत्येक कुटुंब लखपती करण्याचे उद्दिष्ट आहे.