रोखठोक : हास्यस्फोटक मोदी!

847


rokhthokपंतप्रधान मोदी हे गंभीर स्वभावाचे आहेत. 2019च्या विजयानंतर ते संसदेचे हेडमास्तर झाले, पण साठ आणि सत्तरच्या दशकात संसदेत आणखी एक मोदी होते. त्यांनी संसद हसतखेळत ठेवली होती.

भारतीय जनता पक्षाला लोकसभेत 303 जागा मिळाल्या. संसदेचे चित्र त्यामुळे साफ बदलले. सत्ताधारी भाजपच्या चेहऱयावर कमालीचे गांभीर्य आणि प्रत्येकाच्या डोक्यावर जणू देश चालवण्याचे ओझे आले. सभागृहात चिंता जास्त. हास्य आणि विनोद हद्दपार झाला. एकेकाळी संसदेत हसतखेळत काम चालत असे. संपूर्ण संसद परिसर आता तणावाच्या ओझ्याखाली वावरताना पाहिला की, हा ‘तणाव’ दूर करून सभागृह हास्यात बुडवणाऱ्या नेत्यांची व खासदारांची आठवण येते. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गंभीर स्वभावाचे, पण त्यांच्याच गुजरातमधून लोकसभेत येणारे पिलू मोदी हे विद्वान तितकेच दिलखुलास विनोदवीर होते. आज ‘गोध्रा’चे नाव दंगली, रक्तपातासाठी घेतले जाते, पण याच गोध्रा लोकसभा मतदारसंघातून पिलू मोदी स्वतंत्र पार्टीचे उमेदवार म्हणून निवडून जात होते. पिलू मोदी हे सार्वजनिक, राजकीय जीवनातील विलक्षण बुद्धिमत्तेचे नेते होते. त्यांचे इंग्रजी फर्डे होते आणि विनोदबुद्धीचे ‘ईश्वरी देणे’ त्यांना लाभले होते.

विनोदाचा समतोल
नरेंद्र मोदी यांच्या निमित्ताने पिलू मोदी यांची आठवण झाली. आजचे मोदी हे नेहरूंना मानत नाहीत; पण पिलू मोदी हे काँग्रेस पक्षात नसले तरी नेहरूंना मानत होते. त्यांचा व नेहरूंचा वाढदिवस 14 नोव्हेंबर या एकाच दिवशी. पिलूंचे वडील होमी मोदी हे देशातले प्रतिष्ठत पारशी उद्योगपती आणि कडवट गांधीवादी. ब्रिटिश काळात ते कायदे मंडळाचे सदस्य होते. स्वतः होमी मोदी हे विनोदवीर होते व हाच गुण चिरंजीव ‘पिलू’त तंतोतंत उतरला. विनोदाचा उद्देश केवळ लोकांना हसविणे हा नसून मानवी व्यवहारात समतोल निर्माण करणे हा आहे असे होमी व त्यांचे पुत्र पिलू यांचे मत होते.

कोण रेकतेय?
पिलू मोदी राज्यसभेत होते, सभागृह सुरू होते. 1980चा तो काळ. पिलू त्यांच्या जोरदार शैलीत बोलत होते. सत्ताधारी बाकांवर काँग्रेसचे तरुण खासदार जे. सी. जैन होते. पिलू मोदी यांच्या भाषणात व्यत्यय आणायचा, टोकाटोकी करण्याची त्यांची सवय होती. या वेळीही जे. सी. जैन यांनी तेच केले. पिलू चिडून म्हणाले, ‘‘स्टॉप बार्किंग!’’ म्हणजे भुंकणे बंद करा. यावर जैन यांनी सभागृह डोक्यावर घेतले. ‘‘सभापती महोदय, हे महाशय मला कुत्रा म्हणाले. ही असंसदीय भाषा आहे.’’ सभापतींच्या खुर्चीवर बसले होते उपराष्ट्रपती हिदायतुल्ला. पिलू यांचे वक्तव्य रेकॉर्डवरून काढण्याचे आदेश त्यांनी दिले. जैन यांच्या चेहऱयावर विजयी हास्य तरळले, पण माघार घेतील ते पिलू कसले? आता ते बोलले, ‘‘ऑल राइट. देन स्टॉप ब्रेइंग!’’ (रेकणे बंद करा!). जैन यांना ‘बेइंग’ शब्दाचा अर्थ समजला नाही. ते शांत बसले व हा शब्द राज्यसभेच्या कामकाजातील ‘रेकॉर्ड’मध्ये कायमचा राहिला.

सीआयएचा हस्तक
‘परकीय हात’ हा शब्द आपल्या राजकारणात अनंत काळापासून आहे. कधी हात अमेरिकेच्या ‘सीआयए’चा तर कधी रशियाच्या ‘केजीबी’चा असतो. इंदिरा गांधींच्या काळात जर कोणी काँग्रेस सरकारला विरोध करण्यासाठी उभे राहिले तर इंदिराभक्त त्याला ‘अमेरिकेचा एजंट’ अशी उपाधी देत. सरकारला विरोध करणे, प्रश्न विचारणारे तेव्हाही ‘आरोपी’च ठरले. स्वतंत्र पार्टीचे पिलू मोदी हे आपले इमान व धर्म राखून होते. त्यामुळे काँगेसवाले त्यांना अमेरिकेचे एजंट म्हणत. एक दिवस पिलू मोदी गळय़ात एक पाटी लटकवून आले. त्यावर लिहिले होते, ‘‘I am a CIA agent?’’ संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये ते बसले. फिरत राहिले. पत्रकार व सर्वच पक्षांच्या खासदारांशी बोलत बसले. हा सीआयए एजंट काँग्रेसला भारी पडला.

इंदिराजींशी मैत्री
पिलू व इंदिराजींचे संबंध मजेशीर होते. ते दोघे राजकीय विरोधी होते, पण व्यक्तिगत जीवनात मैत्री होती. इंदिराजी पिलू मोदींचे संसदेतील एकही भाषण चुकवत नव्हत्या. पिलूंचे भाषण संपताच इंदिराजी ‘तारीफ’ करणारी चिठ्ठी पाठवत. पिलू त्यास उत्तर देत. पंतप्रधानांना पाठवायच्या उत्तराखाली ते लिहीत – ‘पी.एम.’ हा त्यांचा स्वतःचा म्हणजे पिलू मोदींचा ‘शॉर्टफॉर्म’ होता. पिलू अनेकदा इंदिराजींच्या तोंडावर सांगत, ‘‘आय ऍम ए परमनंट पी.एम.! यू आर ओन्ली टेंपररी पीएम!’’ यावर इंदिराजी हसून दाद देत. आणीबाणीच्या काळात सर्व विरोधी पक्षनेत्यांबरोबर पिलू महाशयांनाही तुरुंगात टाकलं. रोहटकच्या जेलमध्ये ते होते. ‘पिलूं’चं जीवनमान संपूर्ण ‘इंग्लिश.’ जेलमध्ये हिंदुस्थानी पद्धतीचे संडास होते. पिलूंचे शरीर भारी भक्कम, वजनदार. त्यांना इंग्लिश कमोडची सवय. त्यावर पाय न ठेवता बसता येत असे. तुरुंगात पिलूंचे वांदे झाले. त्याच दरम्यान पिलूंना इंदिराजींची एक चिठ्ठी मिळाली. ‘‘सर्व ठीक चाललंय ना? काही मदत हवी काय?’’ पिलूंनी त्यांचा त्रास कळवला. इंदिराजींनी तत्काळ रोहटक जेलला आदेश देऊन इंग्लिश कमोड बसवायला सांगितले. या आदेशानंतर मोठी गंमत झाली. तुरुंग अधीक्षकाने संपूर्ण रोहटक पालथे घालूनही त्याला इंग्लिश कमोड मिळाले नाही. तेव्हा एका सरकारी गवंडय़ाने मार्ग काढला. त्याने विटा व सिमेंटपासून कमोडसारखे ‘स्ट्रक्चर’ उभे केले व पिलूंची अडचण दूर झाली.

स्पष्ट आणि परखड
पिलू हे आर्किटेक्ट होते. अमेरिकेच्या बर्कले विद्यापीठातून ते पदवीधर झाले. दिल्लीच्या ऑबेरॉय हॉटेलचे डिझाईन पिलू यांनीच बनवले आहे. इंग्लिश जीवन पद्धतीचा पगडा त्यांच्यावर होता. आणीबाणी हटताच जयप्रकाश नारायण यांच्या अहवालानुसार सर्व विरोधी पक्ष एकत्र आले. त्यांनी जनता पार्टी बनवली, पण पक्षाध्यक्ष कोण यावर एकमत होत नव्हते. सगळय़ांचे अहंकार उफाळून आले. चर्चेच्या दरम्यान पिलू मोदींचे नाव समोर आले. त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले, पण काही गांधीवाद्यांनी विरोध केला. पिलू दारू पितात हा त्यांचा आक्षेप. पिलू दारू पित असत आणि ते उघडपणे प्यायचे. जनता पक्षातील एका गांधीवादी नेत्याने एका बैठकीत हे पिलूंना सांगितले. पिलूंनी पलटवार केला, ‘‘अध्यक्षपदाचा माझ्या बाटलीशी काय संबंध? मला विरोध करण्यासाठी दुसरे कारण शोधा.’’ खरेतर पिलू हे कधीतरीच मद्याला स्पर्श करीत, पण लपूनछपून नाही. पिलूंचा बाणा स्वतंत्र वृत्तीचा होता. स्वाभिमान आणि ताठरपणा त्यांनी शेवटपर्यंत जपला. त्यांची स्वतंत्र पार्टी ही श्रीमंतांची, उद्योगपतींची आणि जहागीरदारांची असल्याचा आरोप होत असे. जयपूरच्या महाराणी गायत्रीदेवीसुद्धा याच पक्षाच्या तिकिटावर जिंकून संसदेत पोहोचल्या होत्या. स्वतंत्र पार्टी भांडवलदार व मुक्त अर्थव्यवस्थेची समर्थक होती. याच पार्टीच्या तिकिटावर पिलू गोध्रा मतदारसंघातून 1967 आणि 1971 साली लोकसभेत गेले. 1978 साली ते जनता पार्टीच्या तिकिटावर राज्यसभेत गेले. पिलू हे प्रखर राष्ट्रभक्त होते. ते श्रीमंत असूनही गरीबांचा विचार करीत राहिले. सत्तरच्या दशकात पिलूंना समजले की, स्वतंत्र पार्टीचे दिवस आता संपले. तेव्हा विरोधकांचे ऐक्य व्हावे या नावाखाली त्यांनी चौधरी चरणसिंगांच्या लोकदलात आपल्या पार्टीचे विसर्जन केले. चौधरी पिलूंना मानत असत. एकदा चौधरींच्या बंगल्यावर पिलू ग्रामीण समस्यांवर चर्चा करीत होते. खेडय़ातील गरजांवर चौधरी बोलत होते. पीक, ट्रक्टर, युरिया, सिंचन, बियाणं यावर चौधरी बोलू लागले. पिलूंनी त्यांना थांबवले व ठणकावून सांगितले, ‘‘चौधरी, हे सर्व नंतर पाहू. आपल्याला गावात मोठय़ा प्रमाणावर सार्वजनिक शौचालये बनवायला हवीत.’’ यावर चौधरी हसले व म्हणाले, ‘‘मोदीसाहब, आप भी क्या बात ले आए.’’ यावर पिलू म्हणाले, ‘‘ही गोष्ट हसून सोडू नका. चौधरीसाहेब, आपण गावात जन्मलात, वाढलात, शिकलात, पण आपण एक महत्त्वाची गोष्ट नजरेआड करताय. सार्वजनिक शौचालये नसल्यामुळे देशातील गरीब महिलांच्या शरीरात बदल होत आहेत. त्यांच्या प्रकृतीसाठी हे चिंताजनक आहे.’’ चौधरींना पिलू मोदींचे म्हणणे पटले. पिलू मोदी फक्त विनोदी नाहीत, तर देशाच्या प्रश्नांवर गंभीर आहेत हे पटले. आजच्या मोदींच्या आधी गावोगाव सार्वजनिक शौचालयाची कल्पना मांडणारे हे मोदी होते. 1979 साली चौधरी चरणसिंग पंतप्रधान झाले, पण पिलूंनी आपला स्वभाव बदलला नाही. त्यांनी सरकारवर तिखट प्रहार सुरूच ठेवले. एकदा संसदेतील चर्चेत ते चरणसिंगांवर गरजले, ‘‘आपके लिए तो हिंदुस्थान झांसी तक ही है। इसके आगे तो आपको पताही नहीं है।’’ (चौधरी चरणसिंगांनी जीवनभर उत्तरेतील शेतकऱ्यांचेच राजकारण केले. त्याचा हा संदर्भ.)

बेटेसे बाप सवाई
पिलू मोदी यांचे वडील सर होमी मोदी हेसुद्धा तितकेच विनोदवीर होते. मोदी हे रसायनच वेगळे असावे. पिलूप्रमाणे होमीसुद्धा कायदे मंडळात होते. केंद्र सरकारातील ते मंत्री होते. प्रख्यात कामगार नेते ना. म. जोशी यांनी विधिमंडळातील आपल्या भाषणाची सुरुवात अशी केली, ‘‘अध्यक्ष महाराज, मला हे कळत नाही की…’’ मोदी मध्येच ओरडले, ‘‘तीच तर खरी तुमची अडचण आहे.’’ सभागृहात प्रचंड हास्यकल्लोळ झाला. 1937च्या अर्थसंकल्पात विदेशी दारूवर कर वाढला. त्याला विरोध करताना मोदी म्हणाले, ‘‘दारूवरील कर वाढण्याच्या आधीपासून मी दारू पितो आहे आणि सिगारेटही ओढतो आहे, पण आता एवढा कर वाढल्यानंतर पुढे काय करायचं हे मला कळत नाही.’’ तेव्हा सदस्य सत्यमूर्ती ओरडले, ‘‘ताडी प्या.’’ मोदी शांतपणे उत्तरले, ‘‘माफ करा, कोणत्याही स्वदेशी वस्तूप्रमाणे ताडीने माझे डोके गरगरते!’’ मद्यपानाचे मोदी पिता-पुत्रांना व्यसन नव्हते. दारू त्यांना आवडत होती. पिताश्री मोदी म्हणत, ‘‘थोडीशी दारू घेतली की मी गंभीर होतो. आणखी थोडी घेतली की मी आनंदी होतो. (When I take little, I become sober and when I take Little more, I become gay.)’’ पण मोदींनी मर्यादा कधी सोडल्या नाहीत.

नरेंद्र मोदींचे स्थान वेगळं. हे मोदी गंभीर आहेत. त्यांच्यावर राष्ट्र चालविण्याचे ओझे आहेच, पण देशाच्या राजकारणात व संसदेत दुसरे एक मोदी होते ते जन्मभर हसले व इतरांनाही हसवले.
त्यांचे स्मरण करायला काय हरकत आहे?

Twitter- @rautsanjay61
Email- [email protected]

आपली प्रतिक्रिया द्या