रोखठोक- आपला देश व ख्रिश्चनांचे योगदान

rokhthokस्वातंत्र्य लढय़ात ख्रिश्चनांचा सहभाग होता काय? यावर भाजपकडून संशय निर्माण केला गेला. हा प्रश्न विचारणारे भाजपचे खासदार गोपाळ शेट्टी यांना माफी मागावी लागली. दोन टक्के ख्रिश्चन देशाचे राजकीय भविष्य बदलू शकत नाहीत; पण ख्रिश्चन समाजाच्या राष्ट्रभक्तीवर जे प्रश्नचिन्ह निर्माण करीत आहेत त्यांनी इतर ‘धर्म’ राष्ट्रीय प्रवाहात काय करीत आहेत, ते पहायला हवे.

हिंदुस्थानातील ख्रिश्चनांचा स्वातंत्र्य लढय़ात सहभाग होता काय? यावर एक वाद निर्माण झाला व चहाच्या पेल्यातील वादळाप्रमाणे तो संपलाही. भारतीय जनता पक्षाचे खासदार गोपाळ शेट्टी हे मुस्लिम समाजाच्या एका मंचावर गेले व देशाच्या स्वातंत्र्य लढय़ात हिंदू-मुसलमान खांद्यास खांदा लावून लढले; पण ख्रिश्चनांचा सहभाग लढय़ात नव्हता असे त्यांनी सांगितले. इंग्रजांचे राज्य हे ख्रिश्चनांचे राज्य असल्याने आपल्या धर्माचे राज्य आले असे येथील ख्रिश्चनांना वाटत असावे, असे मत श्री. शेट्टी यांनी व्यक्त केले व त्यातून चार दिवस चर्चा झाली. मुंबईसह महाराष्ट्राला मुसळधार पावसाने झोडपले नसते व मुंबईतील जलप्रलयाच्या बातम्यांनी वृत्तवाहिन्यांचे छोटे पडदे व्यापले नसते तर ख्रिश्चनांच्या स्वातंत्र्य लढय़ातील सहभागाविषयीच्या वक्तव्याचे पुराण महिनाभर पुरले असते. भारतीय जनता पक्षाने खासदार शेट्टी यांना माफी मागायला लावली आणि वादावर पडदा टाकला. कारण ते आता सत्तेवर आहेत व ख्रिश्चन मतदारांचे प्राबल्य असलेल्या ईशान्येकडील राज्यांत त्यांना निवडणुका लढवायच्या आहेत. दुसरे असे की, सोनिया गांधी सत्तेवर नाहीत व त्यांची राजकीय ताकद कमी झाली. मग ख्रिश्चनांचा मुद्दा उचलून कुणाला काय फायदा?

ख्रिश्चनांचा सहभाग
हिंदुस्थानात इंग्रजांचे राज्य जसे होते तसे पोर्तुगीजांचे राज्य होते. वसई प्रांतात पोर्तुगीज आले व त्यांनी वसाहत निर्माण केली. त्यातून ‘बाटवाबाटवी’ व सक्तीच्या धर्मांतराचे प्रयोग झाले. वसईतील सध्याच्या ख्रिश्चनांतही मूळ जातीनुसार भेदाभेद आहे. त्यात ब्राह्मण व बहुजन समाज असा भेदाभेद आहे. पोर्तुगीज राजवट असलेल्या गोव्यातही हा जातीभेद आजही आढळतो; पण वसई व गोव्यातील ख्रिश्चनांतही स्वातंत्र्याची प्रेरणा होती व परकीय राजवटीविरोधात त्यांच्या नेत्यांनी उठाव केले. वसईतील कॅथलिकांचाही स्वांतत्र्य लढय़ात सहभाग होता. वसईचे फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी शेट्टी यांच्या वक्तव्यावर एक पत्र ‘लोकसत्ता’त प्रसिद्ध केले व त्यातील माहिती रंजक आहे. या पत्रात श्री. दिब्रिटो म्हणतात- ‘‘ब्रिटिश हे ख्रिश्चन असल्याने भारतातील कॅथलिक समाज इतर समाजांसारखा मोठय़ा प्रमाणात स्वातंत्र्य लढय़ात सहभागी झाला नाही, असे खासदार गोपाळ शेट्टी यांनी म्हटले आहे.

शेट्टी यांनी आपले मूळ विधान फिरवून ख्रिश्चनांऐवजी आता कॅथलिक असा बदल केला आहे. त्यामुळे त्यांचा पाय अधिकच खोलात गेला आहे. वास्तविक ब्रिटिश हे प्रॉटेस्टंट (अँग्लिकन) होते आणि त्या काळी कॅथलिक आणि प्रॉटेस्टंट यांच्यात विस्तव जात नव्हता. म्हणजे शेट्टींची समीकरणे ग्राहय़ धरायची तर कॅथलिकांनी त्यांना विरोधच करायला हवा होता! धर्माच्या नावाने नव्हे तर राष्ट्रप्रेमामुळे ख्रिस्ती लोक स्वातंत्र्य लढय़ात ओढले गेले होते. राजकीय विधान करताना आपण काय बोलतो याचे भान शेट्टी यांना राहिलेले दिसत नाही. सर्वच ख्रिस्ती लोकांनी भारतीय स्वातंत्र्य लढय़ात सहभाग घेतला आहे. इंडियन नॅशनल काँगेसचे पहिले आणि आठवे (१८८५ व १८९२) अध्यक्ष व्योमेशचंद्र बॅनर्जी हे ख्रिस्ती होते. ख्रिस्तोदास पाल यांनी १८७४ साली ‘हिंदू पेट्रिऑट’ या नियतकालिकात लेख लिहून भारतात होमरूल लीगची मागणी केली. कालिचरण बॅनर्जी यांनी १८८७ साली स्वातंत्र्य मिळविण्यासाठी ‘कलकत्ता ख्रिस्तो समाजा’ची स्थापना करून ब्रिटिशांशी संघर्ष केला. दक्षिण हिंदुस्थानातील ख्रिश्चनांनीसुद्धा ब्रिटिशांना विरोध केला होता.

मिशनऱयांनी काढलेल्या  शाळांमुळे, इंग्रजी शिक्षणाच्या प्रसारामुळे भारतीयांना अमेरिकन, फ्रेंच, आयरिश स्वातंत्र्य लढय़ांची ओळख झाली. त्यामुळे स्वातंत्र्याच्या चळवळीला खतपाणी घातले गेले, ही गोष्ट नजरेआड करता येत नाही.’’ गोपाळ शेट्टी यांचा महाराष्ट्राचा इतिहासही कच्चा दिसतो. उत्तन (भाईंदर) येथील बॅरिस्टर जोसेफकाका बॅप्टिस्टा हे लोकमान्य टिळकांचे सहकारी होते. ‘स्वातंत्र्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि ते मी मिळविणारच’ या घोषवाक्याचे ते जनक होते. त्यांनी लोकमान्यांचे आणि हिंदुत्व विचारांचे प्रवर्तक स्वा. सावरकर यांचे वकीलपत्र घेतले होते. लोकांना एकत्रित करण्यासाठी गणेशोत्सव साजरा करण्याच्या कल्पनेला त्यांचा पाठिंबा होता. शेट्टींच्या माहितीसाठी ते कॅथलिक होते. वसईतील कॅथलिकांनीही स्वातंत्र्य लढय़ात सहभाग घेतला होता. निर्मळ येथील समाजसेवक स्व. जोसेफ दालमेत यांचे आजोबा इतूर ऊर्फ काल्या दुमा दालमेत हे ब्रिटिशांविरुद्ध लढले होते. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत वसईतील कॅथलिकांनी लाठय़ाकाठय़ा खाऊन तुरुंगवास भोगला आहे. पर्यावरण रक्षणासाठी झालेल्या हरित वसई आंदोलनात येथील कॅथलिक आघाडीवर होते.

देशभक्त कोण?
गोवा, मेघालय, नागालॅण्ड, मिझोराम, अरुणाचल प्रदेश, केरळ अशा राज्यांतील राजकारण आज ‘ख्रिश्चन’ मतदारांच्या हातात आहे. ईशान्येकडील राज्यात आदिवासींचे धर्मांतर झाले व ते ख्रिश्चन झाले. वसई, गोवा, आंध्र, ओडिशातही ते घडले. केरळचे राजकारण चर्चमधून चालते, तसे गोव्याचेही चालते. पण मेघालय, अरुणाचल प्रदेश या सीमेवरील राज्यांत राष्ट्रभक्तीची चेतना मी पाहिली ती थक्क करणारी आहे. १९६१ च्या चीन युद्धात अरुणाचलमध्ये घुसलेल्या चिनी सैनिकांसमोर सैनिक व प्रशासन टिकले नाही, पण अरुणाचलची ‘पहाडी’ जनता चिन्यांसमोर उभी ठाकली. हे लोक ख्रिश्चनच होते, त्यामुळे स्वातंत्र्य लढय़ात ते नव्हते असे म्हणता येणार नाही. गोव्यातील पोर्तुगीजविरोधी स्वातंत्र्य लढय़ाचे रणशिंग फुंकणारे डॉ. जुलियाव मेनेझिस व टी. बी. कुन्हा होते. लोहियांना गोव्यात आणले ते मेनेझिस यांनी. त्याच गोव्यात आजही ‘पोर्तुगीजां’चा वंश वावरतो याचे दुःख होते.

इतर पंथांचे काय?
ख्रिश्चनांचा सहभाग स्वातंत्र्य लढय़ात नव्हता हे म्हणणे सर्वार्थाने चूक आहे. मुंबईतलेच असंख्य ख्रिश्चन मला माहीत आहेत की ते स्वातंत्र्य लढय़ात पुढे होते (अल्वा, अल्वारिस, पिंटो). हिंदुस्थानच्या तिन्ही सैन्य दलात ख्रिश्चन मोठय़ा प्रमाणावर आहेत. हिंदुस्थानी स्वातंत्र्य लढय़ात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका नेमकी काय होती? यावर इतक्या वर्षांनंतरही शंका विचारल्या जातात. महात्मा गांधी यांनी स्वातंत्र्य चळवळ पुढे नेण्यासाठी गुजरातचा त्याग का केला, ते महाराष्ट्रात का आले, यावरही प्रकाश पाडायला हवा. ख्रिश्चन समाजाविषयी भाजप नेत्यांनी जे वक्तव्य केले तसे वक्तव्य ते ‘जैन’ किंवा अन्य धर्मीयांबाबत करू शकतील काय? आर्थिक नाडय़ा ज्यांच्या हाती असतात तो समाज कोणत्याही ज्वलंत लढय़ात सहभागी नसतो. त्यांना आपला व्यापार व आर्थिक पकड याच्याशीच मतलब असतो. देशाच्या स्वातंत्र्य लढय़ात व राष्ट्राच्या सुरक्षेत योगदान काय? असे प्रश्न निर्माण व्हावेत असे अनेक धर्म व पंथ आपल्या देशात आज आहेत. राष्ट्रीय सुरक्षेत, सैन्यात अर्धा टक्काही योगदान नसलेल्या समाजाचे नेते राष्ट्रभक्तीवर मोठी प्रवचने झोडतात तेव्हा आश्चर्य वाटते. लोकशाहीत आता धर्म, जातीइतकेच पैशाला महत्त्व आले. पैशांचा वापर करून मोठे मेळावे करायचे व त्यात ‘धर्मा’वर बोलायचे. हिंदुस्थानच्या राजकारणात मुसलमानांना महत्त्व मिळाले, कारण त्यांची अफाट लोकसंख्या. निवडणुकांचे निकाल बदलायची ताकद जेवढी मुसलमान समुदायात आहे तेवढी ख्रिश्चनांत नाही. त्यामुळे अल्पसंख्याक म्हणून मुसलमानांच्या भावनांची जितकी काळजी घेतली जाते तेवढी ख्रिश्चनांच्या भावनांची घेतली जात नाही. फक्त दोन टक्के ख्रिश्चन समाज या देशाचे राजकीय भाग्य बदलू शकत नाही, पण सोनिया गांधी या ख्रिश्चन व रोमच्या अशा विरोधी प्रचारातून भारतीय जनता पक्ष सत्तेवर आला हे सत्य आहे. भाजपच्या यशात ख्रिश्चनांचे योगदान हे असे आहे!

ईमेल-rautsanjay61@gmail.com
ट्विटर हँडल- @rautsanjay61